अनिल सावंत हेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार;अनेक प्रकल्प गुजरातला गेले परंतु एकही प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही – खा. अमोल कोल्हे
भगीरथ भालके हे काँग्रेसचेच उमेदवार आहेत का काँग्रेस पक्षाने तपासून पहावं - खा. अमोल कोल्हे यांचा हल्लाबोल

संपादक – दिनेश खंडेलवाल
अनिल सावंत हेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार;अनेक प्रकल्प गुजरातला गेले परंतु एकही प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही – खा. अमोल कोल्हे
भगीरथ भालके हे काँग्रेसचेच उमेदवार आहेत का काँग्रेस पक्षाने तपासून पहावं – खा. अमोल कोल्हे यांचा हल्लाबोल
पंढरपूर(प्रतिनिधी):- २५२ पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या पासून एकीकडे महायुतीचा भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली तर महाविकास आघाडी कडून काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अनिल सावंत यांना उमेदवारी देण्यात आल्याने महाविकास आघाडीमध्ये अधिकृत व पुरस्कृत असा उमेदवार कोण? असा संभ्रम पूर्ण मतदार संघामध्ये तसेच मतदारसंघातील जनतेला पडला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत हेच असल्याचे शिरुरचे खासदर अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की काँग्रेस पक्षाने जो उमेदवार जाहीर केला त्या उमेदवाराचं नेमकं दल (पक्ष) कोणता आहे. अशा शब्दात खिल्ली उडविली, भगीरथ यांनी काँग्रेसकडून अर्ज भरला, खरंतर हे एक वैशिष्ट्य आहे. त्यांनी दोन्ही पक्षाकडे मुलाखती दिल्या होत्या असं सहसा राजकारणात कधी ऐकिवात येत नाही आणि त्यामुळे त्यांचा जो काही प्रवास होतोय म्हणजे पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवून नंतर बी आर एस पक्षात प्रवेश करून पुन्हा बी आर एस मधून काँग्रेस पक्षाकडे येऊन उमेदवारीसाठी मुलाखती देणे मला वाटते यामध्ये या मतदारसंघातील मतदार सुज्ञ आहेत ते तुतारी वाजवणारा माणूस समोरील बटन दाबेल यात शंका नाही. आपल्या मतातून जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार हा फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अनिल सावंत हेच असतील ते कोणालाही पाठिंबा देणार नाहीत. या मतदारसं घांमध्ये एक वेगळा नरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय हा नरेटीव्ह तोडण्यासाठीच मी उपस्थित आहे. मतदार जनतेमध्ये संभ्रमावस्था नसून ज्यांना या निवडणुकीत धोका वाटतो त्यांनी संभ्रमावस्था पसरवण्याचे काम केले आहे.
महाराष्ट्रातून गेल्या अडीच वर्षांमध्ये सरकारने मोठमोठे उद्योग गुजरातला घेऊन गेले. त्यामुळे येथील तरुणांना रोजगार नाही. रोजगाराची साधने नाहीत. असंविधानिक सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात एकही प्रकल्प महाराष्ट्रात आणला नाही. यावरून या सरकारची राज्यातील जनतेच्या विशेष करून तरुणांच्या, युवकांच्या हाताला रोजगार देण्याचे कार्य घडणार का असा प्रश्न उपस्थित केला.
महाविकास आघाडीचा जाहीरनाम्यात पंचसूत्री आहे. त्यातील पाचवे सूत्र सर्व समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यामध्ये जातनिहाय जनगणना करून महाराष्ट्रात आरक्षण मर्यादा पन्नास टक्के च्या वर नेण्याचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. राज्यामध्ये शेतकरी आक्रोश करत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. उत्पादन खर्च सहा हजार चारशे येत असताना भाव मात्र तीन हजार आठशे रुपये जेमतेम मिळत असल्याने शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्रात माता-भगिनींना एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे मात्र त्याचवेळी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. राज्यात माता-बघिनी गायब होण्याच्या घटनेमध्ये लक्षणीय प्रमाण वाढले असून एकूणच कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले दिसत आहे.
जनतेला हे सर्व माहीत असल्याने जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहत असून या निवडणुकीत महाविकास आघाडी सर्वांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. महाराष्ट्रातील जनता एक वेळ चुकीला माफ करू शकते परंतु गद्दारांना कदापि माफ करणार नाही हे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालावरून दिसून येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेमध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते राहुल शहा, संभाजी ब्रिगेडचे नेते दीपक वाडदेकर, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष संदीप मांडवे, रवी पाटील, सहकारी श्याम गोगाव ,संदीप तापडिया तसेच महिला पदाधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.