अभ्यासासाठी दोन तास स्तुत्य उपक्रमांची दखल शिक्षण विभाग घेणार का!
ग्रामपंचायतीचा शिक्षणासाठी पुढाकार;शिक्षण विभाग मात्र उदासीन

संपादक-दिनेश खंडेलवाल
अभ्यासासाठी दोन तास स्तुत्य उपक्रमांची दखल शिक्षण विभाग घेणार का!
ग्रामपंचायतीचा शिक्षणासाठी पुढाकार;शिक्षण विभाग मात्र उदासीन
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील देगाव ग्रामपंचायतीने सायंकाळी सहा ते आठपर्यंत “अभ्यासासाठी दोन तास” हा उपक्रम राबवून संपूर्ण राज्यात आदर्श निर्माण केला आहे.याची दखल जवळपास सर्वच माध्यमांनी घेतली होती. तसेच समाज माध्यमांवरही हा प्रयोग अतिशय गाजत आहे. संपूर्ण राज्यभर हा विषय कौतुकाने चर्चेला जात असला तरी पंढरपूर पंचायत समिती व सोलापूर जिल्हापरिषद शिक्षण विभाग मात्र या विषयाच्या बाबतीत अद्यापही उदासीन असल्याचे चित्र आहे.
सध्या मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने सर्वच गावात असे उपक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या या प्रयोगाची साधी माहिती घेण्याची तसदीही शिक्षण विभागाने घेतली नसल्याने जिल्ह्यातील शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी किती गंभीर आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पंढरपूर तालुक्यातील देगाव ग्रामपंचायतीच्या वतीने “अभ्यासासाठी दोन तास” या उपक्रमांतर्गत दररोज सायंकाळी सहा ते आठच्या दरम्यान गावामध्ये टीव्ही व मोबाईलच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोना काळात मुलांचा अभ्यास बुडू नये म्हणून मुलांना अभ्यासासाठी हातात मोबाईल देण्यात आलेले होते. मात्र या मोबाईलचा अतिरेकी वापर झाल्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. तसेच मोबाईलच्या अतिरिक्त सवयीमुळे मुले अभ्यासापासून दूर जाऊ लागली आहेत. त्यामुळे घरातील संवादही आता कमी होऊ लागला आहे.
यावर उपाय म्हणून देगाव ग्रामपंचायतीने अभ्यासासाठी दोन तास हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे गावात दररोज सायंकाळी सहा वाजता सायरन वाजवला जातो व सायरन वाजताच गावातील शाळेत जाणारे प्रत्येक मूले,विद्यार्थी हे अभ्यासाला बसतात. तसेच गावातील सर्वच घरांमधील मोबाईल व टीव्ही या दोन तासाच्या काळात बंद ठेवले जातात. या वेळेत पालक मुलांकडून केवळ अभ्यास करून घेतात.
मोबाईल,टीव्ही बंद ठेवून समोरासमोर प्रत्यक्ष संवाद देखील करतात. यामुळे मोबाईलच्या अतिरेकी वापरापासून होणारा दुष्परिणाम काहीसा कमी होण्यास मदत होत आहे. आणि मुलांना अभ्यासाची गोडी देखील लागत आहे. त्यामुळे सर्वत्र या प्रयोगाचे कौतुक केले जात आहे. मात्र याचवेळी पंढरपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने मात्र अद्यापही या उपक्रमाची दखल घेतली नसल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या चार पाच दिवसांपासून गाजत असलेल्या या प्रयोगाची एकाही अधिकाऱ्याने माहिती घेण्याची तसदी घेतली नाही अगर याठिकाणी भेट दिलेली नाही. सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागही यापासून अलिप्तच असल्याने असे नवनवीन उपक्रम विविध ग्रामपंचायती कडून राबवले जात असले तरीही शिक्षण विभाग मात्र आपली उदासीनता कधी झटकणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.