सोलापूरात जीबीएस आजाराचे उपचार मोफत; जिल्हाधिकाऱ्यांनी दिला २ कोटीचा निधी
सोलापूरात आढळले जीबीएस या आजाराचे पाच रुग्ण

संपादक – दिनेश खंडेलवाल
सोलापूरात जीबीएस आजाराचे उपचार मोफत; जिल्हाधिकाऱ्यांनी दिला २ कोटीचा निधी
सोलापूरात आढळले जीबीएस या आजाराचे पाच रुग्ण
सोलापूर(प्रतिनिधी):- राज्यात गुलियन बैरी सिंड्रोम म्हणजेच जीबीएस या दुर्मिळ आजाराने धुमाकूळ घातला आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यांमध्ये ३० जानेवारीपासून प्रत्येक घरा घरात सर्वे करण्यात येणार असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहे. यासाठी दोन कोटीच्या निधीची पूर्तता करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. सध्या महाराष्ट्रात या आजाराचे तब्बल ७४ रुग्ण आढळले आहेत. यातील १४ रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु आहेत. तर पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातील एका रुग्णाचा मृत्यू २६ जानेवारी रोजी उपचारादरम्यान सोलापूर येथे झाला आहे. सध्या सोलापुरात चार रुग्ण उपचार घेत आहेत. हे सर्व रुग्ण सोलापूर जिल्ह्याबाहेरील आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
याच पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने जिल्हा नियोजन समिती मधून दोन कोटीचा निधी आरोग्य यंत्रणेकडे सुपूर्द केला आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सिव्हील हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी पत्रकार परिषद घेत सोलापूरकरांना या आजाराबाबत घाबरुन जाऊ नये असे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले, सोलापुरात या आजाराचे पूर्णपणे मोफत उपचार केले जाणार आहेत. या आजाराला घाबरू नये केवळ काळजी घेणे महत्त्वाचे आहे. हा आजार संसर्गजन्य नाही असे सांगत दूषित पाणी न पिता पाणी उकळून प्यावे, उघड्यावरचे व शिळे अन्न खाऊ नका, मांसाहारी पदार्थ आणि अंडी चांगल्या प्रकारे शिजवून खावीत असे आवाहन करण्यात आले. तसेच त्यांनी जीबीएस आजारावर उपचारासाठी आवश्यक औषधे ईमोग्लोबिन तसेच इंडक्शन स्टडी साठी आवश्यक मशनरी खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून दोन कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आवश्यकता भासल्यास आणखीही निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.
जीबीएस हा संसर्गजन्य आजार नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये या आजारात दूषित पेशी या नर्वस सिस्टीमवर अटॅक करतात. त्यामुळे रुग्णांना जुलाब आणि उलट्या झाल्याने पायाची शक्ती गेली तर ही त्याची लक्षणे आहेत तसेच सर्दी झाल्यानंतर हात पायातील शक्ती जाऊन घशात अन्न गिळताना त्रास होणे, दम लागणे, हातापायाला मुंग्या येणे हे या आजाराची लक्षणे आहेत. अशी लक्षणे असणाऱ्या व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकल मधून औषधे घेऊ नयेत जीबीएस हा आजार साठ वर्षांवरील व्यक्तींना तसेच पाच वर्षांवरील वयोमानाच्या लोकांमध्ये प्रामुख्याने जाणवतो असे डॉक्टर वैशिपायन शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सांगितले.
जीबीएस रुग्णांकरिता सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठांसाठी दहा तर लहान मुलांसाठी पाच व्हेंटिलेटर आरक्षित ठेवले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी स्वच्छ व बिसलरीचे पाणी प्यावे अथवा पाणी गरम करून ते प्यावे हा आजार शंभर टक्के बरा होतो. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही असेही डॉक्टर ठाकूर यांनी सांगितले.