श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर ची रौप्य महोत्सवी यशोगाथा
शैक्षणिक लेख १६/०८/२०२३
संपादक-दिनेश खंडेलवाल
श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर ची रौप्य महोत्सवी यशोगाथा
शैक्षणिक लेख १६/०८/२०२३
तंत्रशिक्षण क्षेत्रातसन १९९८ साली लावलेल्या ‘स्वेरी’ नावाच्या रोपट्याचे आज एका वटवृक्षात रूपांतर झाले आहे. गेल्या २५ वर्षाच्या काळात ‘स्वेरी’ने शैक्षणिक, सामाजिक व संशोधनात्मक क्षेत्रात केलेल्या बहुमोल कार्याचा घेतलेला हा लेखा जोखा…….
गोपाळपूर (ता.पंढरपूर) हे पंढरपूरच्या शेजारी वसलेले, अध्यात्मिक परंपरा असलेले छोटेसे गाव. या गावाच्या पूर्व बाजूला असलेल्या माळरानावर ‘श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’ हे शैक्षणिक नंदनवन फुलले असून राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वप्नातील समृद्ध खेडे प्रत्यक्षात उभा राहिले आहे. पंढरपूर सारख्या ग्रामीण भागात उच्च तंत्रशिक्षणाचा नवीन ‘पंढरपूर पॅटर्न’ स्वेरीने निर्माण केला आहे.
साधारणपणे १९९७ च्या दरम्यान तालुक्यात व जिल्ह्यातही शिक्षणाच्या सुविधा खूप कमी प्रमाणात होत्या. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पुणे, सांगली, मुंबई अशा शहरात जावे लागत होते. सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाऊन शिक्षण घेणे हे अवाक्याबाहेरचे होते. त्यामुळे तंत्र आणि व्यावसायिक शिक्षणाची अपेक्षा सोडून पंढरपूर परिसरातील विद्यार्थी हा कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेची पदवी घेऊन शेती आणि जमेल तो छोटा मोठा व्यवसाय करीत होता. अशा पार्श्वभूमीवर खर्डी सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या डॉ. बी. पी. रोंगे यांनी सर्वार्थाने संपन्न अशी उच्च शिक्षण सुविधा पंढरपूर मध्येच निर्माण करण्याचा ध्यास घेतला आणि मग स्वप्नवत असे तंत्रशिक्षण देणारे महाविद्यालय त्यांच्या अभियंता मित्रांच्या सहकार्याने उभा राहिले.
अभियांत्रिकी, तांत्रिक, वैद्यकीय, व्यवस्थापन हे शिक्षण पुण्या-मुंबईची मक्तेदारी झाली होती. अशा पार्श्वभूमीवर डॉ. बी. पी. रोंगे यांनी आज तंत्रशिक्षणामुळे फक्त जिल्ह्यातच नव्हे, तर राज्याच्या नकाशात पंढरपुरचे नाव उज्वल केले आहे. सन १९९८ साली श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नामक संस्थेची पायाभरणी करीत अभियांत्रिकी पदवीच्या प्रथम वर्षाला सुरवात केली. सुरवातीला अभियांत्रिकी पदवी व त्यानंतर २००६ साली बी. फार्मसी महाविद्यालय स्थापन केले. पुढे ‘पंढरपूर पॅटर्न’ च्या माध्यमातून शिक्षणाचे विविध उपक्रम राबवीत असताना स्वेरीच्या कार्याला यश मिळत राहिले. २००८ साली डी.फार्मसी व डिप्लोमा अभियांत्रिकी ही महाविद्यालये स्थापन करण्यात आली. पदव्युत्तर पदवी असलेला एम.बी.ए. हा अभ्यासक्रम २००८ पासून सुरु करण्यात आला. सोबतीला एम.ई./एम.टेक., एम. फार्मसी व त्यांचे पीएच.डी. अभ्यासक्रम देखील सुरु करण्यात आले. स्वेरीच्या उच्चतम गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लौकिक देशभर गेल्याने, एनबीए, नॅक या मानांकनामुळे उत्तरपूर्व, दक्षिण भारतासह जम्मू काश्मीर आणि मध्य भारतातूनही शेकडो विद्यार्थी स्वेरीमध्ये शिक्षणासाठी पंढरीत दाखल होऊ लागले आणि शिक्षण पूर्ण करून आपले उज्वल भविष्य घडवून बाहेर पडू लागले आणि पाहता पाहता स्वेरीच्या या रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात झाले.
स्वेरीने इतर कंपन्या व संस्थांसोबत सामंजस्य करार करून शैक्षणिक कार्यात आणखी भर टाकण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविला. त्यात सुरवातीला भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई, राजीव गांधी सायन्स अॅण्ड टेक्नालॉजी कमीशन, महाराष्ट्र शासन, राजा रामण्णा सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड टेक्नालॉजी इंदौर, टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिसेस यांच्या समवेत करार करण्यात आले. शिक्षण घेतानाच व्यवसाय आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे हे स्वेरीचे वैशिष्ट्य होय. प्लेसमेंटच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी स्वेरीने ६०२ हून अधिक रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या तर प्रशासकीय क्षेत्रात आजपर्यंत जवळपास ५० हून अधिक विद्यार्थी कार्यरत आहेत. मागील ५ वर्षात २१०० हुन अधिक विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या माध्यमातून नामांकित कंपन्यात भरघोस पॅकेजवर नोकऱ्या मिळाल्या आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयाला राष्ट्रीय दर्जाच्या ‘नॅक’ या मानांकनाने सन्मानित केले आहे. एकाचवेळी तब्बल १६ माजी विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होवून सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून यशस्वी झाले आहेत. तसेच अनेक विद्यार्थी देशातील विविध राज्यात व बाहेरील देशात आपले करिअर करत आहेत. स्वेरीने प्रत्येक वर्षी विद्यापीठ परीक्षांमध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
विद्यार्थ्यांना आदर्श आणि जबाबदार नागरिक बनवण्यासाठी वेळोवेळी विचारवंत, तज्ञ सन्माननीय व्यक्तींचे मार्गदर्शन आयोजित केले जाते. स्वेरीमध्ये पूर्णपणे रॅगिंग फ्री वातावरण असून, तंबाखूजन्य पदार्थ सेवनावर पूर्णपणे बंदी आहे. मुलींसाठी सुरक्षित कॅम्पस, वाय-फाय कॅम्पस, सर्वत्र सीसीटीव्हीची निगराणी, रात्र अभ्यासिका आदी
सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. गरीब व होतकरू विद्यार्थ्यासाठी ‘कमवा आणि शिका’ योजना कार्यान्वित असून गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर सुमारे १५ लाखांची बक्षिसे दरवर्षी दिली जातात.
स्वेरीमध्ये केवळ पदवी देऊन विद्यार्थ्यांना निरोप दिला जात नाही तर त्यांच्यामध्ये संशोधन संस्कृतीचे बीजारोपण केले जाते. स्वेरीच्या संशोधनातील विस्तार पाहता ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ.अनिल काकोडकर, पंतप्रधान कार्यालयाचे माजी विशेष वैज्ञानिक सल्लागार पद्मविभूषण डॉ. आर. चिदंबरम, पद्मभूषण डॉ. जे.बी. जोशी, पद्मश्री डॉ. शरद काळे, डॉ. कोटा हरिनारायण यांच्या सारख्या सुमारे ५० पेक्षा जास्त शास्त्रज्ञांनी महाविद्यालयास भेटी दिल्या आहेत. स्वेरीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन परिषदा ‘टेक्नो सोसायटल’ या आतापर्यंत चार वेळा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या परिषदांच्या माध्यमातून जगभरातील वैज्ञानिकांच्या चर्चासत्रांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. स्वेरीतील विद्यार्थ्यांना उद्योजकतेबाबत चालना देण्यासाठी ‘सोबस सेंटर ऑफ एक्सलंस’ सुरु करण्यात आलेले आहे.
महाविद्यालयातील प्राध्यापकांचे विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय नियतकालिकांमधून सुमारे ७९० संशोधनात्मक लेख आणि ४६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. संशोधनात २७ पेटंटही महाविद्यालयाने फाईल केलेली आहेत. स्वेरीच्या अनेक प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी स्प्रिंजर्स, स्कोपस सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून शोधनिबंध प्रसिद्ध केलेले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या मॅनेजमेंट कौन्सिल, सिनेट अकॅडमीक कौन्सिल, बीओएसचे चेअरमन, समन्वयक, तसेच अनेक समित्यांचे सदस्यत्व झालेले, अभ्यास व शोध प्रकल्पाच्या निमित्ताने फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया व चीन या देशात अभ्यास दौरा केलेले स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य म्हणून पदभार सांभाळत असलेले डॉ. बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त यांच्या सहकार्याने स्वेरीच्या माध्यमातून राज्यभरातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, व्यवस्थापन आदी महाविद्यालयांतून ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे सुरु आहे. अनेक शैक्षणिक संस्थांना आपले अनेक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांअभावी बंद करावे लागत असताना स्वेरीच्या सर्व जागांवर प्रवेश झाले आहेत. स्वेरीची ही वाटचाल स्वेरीच्या गुणवत्तेचे, विश्वासार्हतेचे प्रतीक आहे. स्वेरीच्या रुपात पंढरपूर सारख्या ग्रामीण भागात उच्च व तंत्रशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून स्वेरीचा नावलौकिक देशपातळीवर गेला आहे. एकूणच उच्च शिक्षणातील ‘पंढरपूर पॅटर्न’ हा ट्रेंड सेट झाला आहे.
चौकट क्रमांक १ –
अत्यंत प्रेरणादायी संस्था, शिक्षण आणि विकास यांचा समन्वय साधत, त्यांना जोडत या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेतले जाते. मला विश्वास आहे की, भविष्यात शाश्वत विकास घडवण्यात ही संस्था मोलाची कामगिरी बजावेल. येथे कार्यरत प्रत्येकाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा !
-पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, जेष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय अणू ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष.
चौकट क्रमांक २-
अतिशय सुंदर शैक्षणिक कार्य करीत असलेल्या स्वेरीला पहिल्यांदा भेट देत असताना मनस्वी अत्यंत आनंद झाला होता. त्यांच्या सोबत ग्रामीण भागात सर्वदूर शिक्षण प्रसाराचे होणारे कार्य, बीएआरसी च्या माध्यमातून ग्रामीण भागात तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे निरंतर कार्य उल्लेखनीय आणि वाखाणण्याजोगे आहे.
-पद्मविभूषण डॉ. आर. चिदम्बरम विशेष वैज्ञानिक सल्लागार, पंतप्रधान कार्यालय
चौकट क्रमांक ३-
१९९८ साली आम्ही अभियंता मित्रांना सोबत घेऊन गोपाळपूर च्या माळावर ज्ञान सत्राची सुरुवात केली होती. या भूमीवर तंत्र शिक्षणातील ज्ञान प्रदान करणारे नंदनवन उभे करण्याचे स्वप्न आम्ही पाहिले होते. सर्वांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा यामुळे स्वेरी स्वप्नवत वाटचाल करते आहे. स्वप्न सत्यात उतरवल्याचे समाधान आहे. ग्रामीण भागातील, सुविधा आणि संधीचा अभाव असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च आणि तंत्र शिक्षण उपलब्ध करून देण्यात, तंत्रज्ञान आणि संशोधनाला चालना देण्यात स्वेरीला यश मिळाले आहे.
-प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थापक सचिव, स्वेरी.
चौकट क्रमांक ४–विशेष लक्षवेधी –
१) स्वेरीचे एकूण कॅम्पस क्षेत्रफळ २७ एकर असून एकूण बांधकाम २२४६१ चौ.मी., एकूण वर्ग खोल्या २८, एकूण प्रशासकीय खोल्या – २८, एकूण प्रयोग शाळा -५४, उच्च क्षमतेचे ६०० संगणक उपलब्ध आहेत.
२) स्वेरीमध्ये २९ शिक्षक पीएच.डी. पदवी धारक आहेत. तर २० शिक्षक पीएच. डी. पदवी धारण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. तसेच ८२ शिक्षकांनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे.
३) संस्थेमध्ये ग्रंथालये, इंटरनेट सुविधा, वसतिगृहे, संमेलन कक्ष, दवाखाना, विद्यार्थी मंच, जीम व भव्य क्रीडांगण इत्यादींचा समावेश आहे. स्वेरीमध्ये २४ तास वाचन कक्ष, १४ तास पुस्तके वाटप, ४६ हजार ५०० तंत्रज्ञान विषयक पुस्तके, ५००० व्यक्ती चरित्रे उपलब्ध आहेत तसेच स्वेरीच्या समृद्ध ग्रंथालयात ४ कोटी ६७ लाखांहून अधिक किंमतीची ग्रंथ संपदा आहे.
४) विद्यार्थ्यांसाठी १८०० प्रवेश क्षमतेची चार वसतिगृहे, विद्यार्थिनींसाठी १६०० प्रवेश क्षमतेची तीन वसतिगृहे, १० उत्तम दर्जाच्या खानावळी, ६ मोठे संमेलन सभा कक्ष व १ मोठा ३५०० जणांची बैठक व्यवस्था असणारा खुला सभामंच आहे.
शैक्षणिक लेख १६/०८/२०२३ – संतोष हालकुडे- ९८५०२४२१५५