पंढरीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस वीज पडून एक महिला मयत तर दोन महिला गंभीर जखमी
विजेचे सहा टॉवर कोसळले,सुमारे ५० ते ६० घराचे पत्रे उडून गेले, विज पडून ऊस जळाला, रस्त्यावर विजेच्या तारा तुटल्या, झाडे उन्मळून पडली
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस वीज पडून एक महिला मयत तर दोन महिला गंभीर जखमी
मयत शारदा कल्याण कुंभार
विजेचे सहा टॉवर कोसळले,सुमारे ५० ते ६० घराचे पत्रे उडून गेले, विज पडून ऊस जळाला, रस्त्यावर विजेच्या तारा तुटल्या, झाडे उन्मळून पडली
पंढरपूर :- गेल्या चार दिवसात तापमान वाढलेले असतानाच अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पंढरपूर शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह, विजेच्या कडकडाटात जोरदार पावसाचे आगमन झाल्याने नागरिक सुखावले. दरम्यान पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे हद्दीतील विठ्ठलवाडी विसावा येथे जोरदार पाऊस सुरू झाल्याने पावसापासून वाचण्यासाठी लिंबाच्या झाडाखाली तीन महिला उभ्या होत्या या ठिकाणी वीज पडल्याने एक महिला जागीच मृत्यू पावली तर दोन महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
गंभीर जखमी बाळाबाई रतन वाघमारे
सदर घटनेची समजलेली अधिक माहिती अशी भटुंबरे हद्दीतील विठ्ठलवाडी विसावा येथील आपल्या शेतामध्ये पिकाला पाणी देण्यासाठी शारदा कल्याण कुंभार ह्या गेल्या होत्या परंतु अचानक पाऊस आल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी त्या लिंबाच्या झाडाखाली आडोशाला थांबल्या याच वेळी वीट भट्टीवर काम करणाऱ्या दोन महिला जनावरांसाठी गवत आणण्याकरता म्हणून घरातून निघालेल्या बाळाबाई रतन वाघमारे व लक्ष्मी महादेव आडगळे याही त्याच लिंबाच्या झाडाखाली आडोशाला थांबल्या होत्या.
पावसाचा जोर वाढत असतानाच विजेचा कडकडाट सुरू झाला आणि अचानक वीज पडून यामध्ये शारदा कल्याण कुंभार या जागीच मृत्यू पावल्या तर बाळाबाई रतन वाघमारे व लक्ष्मी महादेव आडगळे या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. सुमारे दोन तास सुरू असलेल्या जोरदार पावसात शहरातील वीज गेल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित नागरिकांनी मोबाईलच्या बॅटऱ्या सुरू करून रुग्णांवर तातडीने उपचार करण्याची विनंती केली असता तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने गंभीर जखमी असलेल्या महिला रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत.
गंभीर जखमी लक्ष्मी महादेव अडगळे
दरम्यान पंढरपूर शहरासह तालुक्यातील विविध भागात वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे रस्त्यावर विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी झाडे व फांद्या पडल्या आहेत. तसेच विजेचे सहा टॉवर सुद्धा कोसळलेले आहेत. सुमारे ५० ते ६० घराचे पत्रे उडून गेलेले आहेत. विज पडून ऊस जळीत झाला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव काहीकाळ वीज बंद करण्यात आली होती. अनेक ठिकाणी रस्त्यावर व पुलावर पाणी साचल्याने अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
[ पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत. अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर आला.
वादळी वाऱ्यामुळे पंढरपूर शहरातील काही भागातील वीज वाहिन्या बंद करून ठेवण्यात आलेले आहेत. वादळ वारे संपल्यानंतर प्रत्यक्ष आढावा घेऊन सुरक्षितता बघून वीज वाहिन्या चालू करण्यात येतील. कॉटेज कडे जाणारा अंबिका फिडर वर झाडाची फांदी पडल्याने तसेच जोराचे वारे असल्याने वीज बंद आहे. लवकरात लवकर वीज पुरवठा पूर्ववत करणे काम चालू आहे. अशी माहिती नायब तहसीलदार मनोज शोत्री यांनी दिली. ]