उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती;तदर्थ जिल्हा न्यायाधिश- बी.बी.तोष्णीवाल
निरोगी व्यक्तीकडे सुखी जीवनाची संपत्ती आहे
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : आपले आरोग्य आपल्यासाठी सर्वात मौल्यवान असून, नागरिकांनी आरोग्याकडे लक्ष देऊन सुदृढ आरोग्य राखणे गरजेचे आहे खऱ्या अर्थाने आरोग्य हीच संपत्ती आहे असे प्रतिपादन तदर्थ जिल्हा न्यायाधीश बी. बी तोष्णीवाल यांनी केले.
जिल्हा न्यायाधीश श्री एम. बी. लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली. तालुका विधी सेवा समिती पंढरपूर तसेच अधिवक्ता संघ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त कायदेविषयक शिबिर तसेच आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्हा व सत्र न्यायालय पंढरपूर येथे साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास दिवाणी न्यायाधीश एम. आर जाधव, सह. दिवाणी न्यायाधीश ए.आर यादव, अधिवक्ता संघाचे अध्यक्ष भगवानराव मुळे, योग शिक्षक विश्वनाथ धावणे यांच्यासह विधीज्ञ तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना न्यायाधीश तोष्णीवाल म्हणाले, नियमित व्यायाम व योगा केल्याने शारीरिक तंदुरुस्ती कायम राहते तसेच मानसिक दृष्ट्याही निरोगी राहते. निरोगी व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या नेहमी सकारात्मक असते. पैशाने जगातील सर्व सुखे विकत घेऊ शकतो पण चांगले आरोग्य विकत घेऊ शकत नाही. निरोगी व्यक्ती ही खरोखर श्रीमंत आहे त्याच्याकडे सुखी जीवनाची संपत्ती आहे. यासाठी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि आपले जीवन निरोगी ठेवले पाहिजे असेही न्यायाधीश तोष्णीवाल यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अंबिका योग कुटीर यांच्या वतीने योगासनाचे प्रात्यक्षिक दाखण्यात आले. तसेच योग शिक्षक विश्वनाथ धावणे यांनी योगाचे फायदे सांगितले. तसेच मेडी कार्ड कंपनीच्या वतीने विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचात्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन ॲड.राहुल बोडके तर आभार प्रदर्शन ॲड.एम.एम.नाईकनवरे यांनी केले.