कारखाना बंद पडला त्यावेळी नातू पॅनल कुठे होते?- सचिन पाटील
कर्तृत्व कमवाव लागतं ते वारसाने मिळत नाही- अभिजीत पाटील
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : गेले दोन हंगाम विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद असल्याने सभासद शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले मात्र आता निवडणूक लागल्याने योग्य उमेदवारांना सभासद मत देतील अशी प्रतिक्रिया व्यक्त करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी सत्ताधाऱ्यांचे जोरदार वाभाडे काढत कारखाना दोन वर्षे बंद होता तेव्हा नातू पार्टी कुठे होती? असा प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना विचारणा केली. अनेक वाहन मालकांचे ट्रॅक्टर फायनान्सवाल्यांनी ओढून नेले आणि हे दोन दादा मात्र पैसे देण्याऐवजी चेअरमन पदासाठी भांडत आहेत. यांना विठ्ठल परिवार कंटाळला असून आम्हाला श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीस एकदा संधी दिली तर आम्ही सर्वधिक दर देऊ अशी घोषणा त्यांनी केली.
विठ्ठलच्या निवडणूक प्रचाराचा सध्या संपूर्ण तालुकभर धुरळा उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत प्रमुख विरोधक असलेल्या अभिजीत पाटील यांनी सर्वप्रथम आपल्या विचार विनिमय बैठकांना सुरुवात केल्यानंतर आता युवराज पाटील व भगीरथ भालके यांच्याही प्रचाराचा नारळ फुटला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. मात्र थकीत ऊसबिले व कामगार पगारी तसेच दोन हंगाम कारखाना बंद राहिल्याने सत्ताधारी गट काहीसे अडचणीत आलेले दिसत आहेत. तर दुसरीकडे बंद पडलेले साखर कारखाने सुरू करणारे अभ्यासपूर्व असलेले अभिजीत पाटील यांच्याकडे सभासदांचा कल पाहायला मिळत आहे.
शुक्रवारी कोंढारकी,चळे व शनिवारी होळे, देवडे या गावात अभिजीत पाटील यांच्या श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी पॅनेलच्या बैठका पार पडल्या त्यांना मोठा प्रतिसाद लाभलेला पाहायला मिळाला. उपस्थित शेतकरी सभासदांना उद्देशून अभिजीत पाटील यांनी कारखाना कसा चालतो, साखर कशी तयार होते यासह जागतिक बाजारपेठेत साखरेची किंमत किती आणि विक्री कशी करता येईल याचेही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तीन वर्षात दोन हंगाम कारखाना बंद ठेवल्यामुळे विठ्ठलच्या सभासद शेतकऱ्यांची कशी बिकट अवस्था झाली आहे. याचीही जाणीव करून दिली. १२ वर्षे मांडीला मांडी लावून बसलात आणि आता म्हणता आम्हाला काही माहीत नाही असलं काही चालणार नाही सभासद शेतकरी हुशार आहेत. त्यांना सगळं कळतं असे म्हणत युवराज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. नुसता वारसा सांगून किती दिवस असेच फसवत राहणार अण्णांचे खरे वारस हे त्यांच्या विचारांवर चालत असतात आणि तीच त्यांची विचारसरणी आम्ही आत्मसात केल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
दुसरीकडे कारखाना तीन वर्षांत नीट चालवता आला नाही आणि वर्षभरापासून थकीत रक्कमही दिली नाही आणि आता निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन साखर विक्रीचं गाजर सभासदांना दाखवलं जात असून सभासदांनी त्यास भुलू नये असेही ते म्हणाले
यावेळी सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.