216 कोटीचे कर्ज काढले पण साधा नट नाही बदलला -अभिजित पाटील
काही ठिकाणी पोलीस संरक्षणात सभा घ्यावी लागते;तरीही विजयाचे खोटे दावे करतात
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून समजला जाणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना दिसत आहे. “२१६ कोटींचं कर्ज काढलं पण या २१६ कोटी रुपयांत एक साधा नट पण नाही बदलला मग मग हे पैसे गेले कुठे?एकीकडे शेतकरी सभासदांच्या हक्काचे उसबील दिले नाही आणि दुसरीकडे सत्ताधारी प्रचार करत फिरत आहेत. आज काहीजण हलग्या वाजवून तुमचे स्वागत करत आहेत. त्यांची माहिती घेतली तर तेच तुमच्या १०९ कोटींचे लाभार्थी आहेत. त्यांना कारखाना आणि तुमच्याशीही काहीच देणेघेणे नाही मात्र अभिजीत पाटील चेअरमन झाला तर आपलं सगळं उकरून काढेल ही भीती आहे म्हणून हलग्या वाजवत आहेत. असा घणाघात श्री विठ्ठल परिवर्तन आघाडीचे प्रमुख अभिजीत पाटील यांनी दोन्ही सत्ताधारी गटांवर केला. श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचारासाठी शेळवे, गुरसाळे आदी गावात सभांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
“सत्ताधारी गटाला सभा घेणे सुद्धा एकीकडे मुश्कील झाले असताना दुसरीकडे मात्र विजयाचे खोटे दावे केले जात आहेत. काल परवा नारायण चिंचोली,वठार गावात पोलीस संरक्षणात सभा घ्यावी लागली. अनेकांना त्यावेळी नजरकैदेत ठेवायची नामुष्की सत्ताधारी गटावर आली असल्याने सभासदांच्या भीतीने उद्या एकवेळ यांना हेल्मेट घालून प्रचाराला यावे लागेल अशी खरमरीत टीका अभिजीत पाटील यांनी शेळवे येथे बोलताना केली. त्यातलाच एकजण बहाद्दर परवा म्हणाला होता की भाटघरच्या पाण्याला जास्त रिकव्हरी लागते आणि उजनीच्या पाण्याला कमी. पाण्याच्या नावाने तुमची दिशाभुल करून दोन दोन रिकव्हरी हाणली जात आहे. माझ्याकडे भंगार झालेला सांगोला कारखाना चालवायला आला त्यात जर १०.८५ रिकव्हरी लागत असेल आणि यांच्या चालू कारखान्यात ८.८० लागते. एवढा फरक पडणे शक्य नाही. यामुळे टनाला ७०० रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.
सत्ताधारी गट आणि आताचा नातू गट दोन्ही गट मांडीला मांडी लावून एकत्र सत्तेत होते. त्यावेळी मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आज नातू सांगत आहेत. मग त्यावेळी ते का बोलले नाहीत त्यांना कुणी अडवलं होत?की कुठल्यातरी फायद्यासाठी ते गप्प होते याच उत्तर त्यांनी द्यावं. त्यामुळे विठ्ठलच्या या परिस्थितीला तुम्हीही तितकेच जबाबदार आहात असा आरोप त्यांनी युवराज पाटील यांचे नाव घेता केला.
आपल्या हक्कासाठी पगारासाठी भांडणाऱ्या कामगारांना तुम्ही जेलमध्ये टाकले. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि वर एकजण बंगल्यावर बोलवुन त्यांना प्रचार करा म्हणून दम देतोय तर एकजण हॉस्पिटलमध्ये बोलवून दम देतोय. ३० महिने त्यांच्या टोपल्यात काही नाही मग तुमचा प्रचार करा म्हणून कोणत्या तोंडाने तुम्ही त्यांना सांगताय? सगळे कामगार वरून त्यांच्याकडे फिरत असले तरी आतून आपल्याला मदत करणार आहेत असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक हणमंत पाटील, मा.सरपंच नंदकुमार बागल, सदस्य धनंजय बागल, माजी नगराध्यक्ष सुभाष दादा भोसले, धनंजय काळे राजाराम बापू सावंत गायकवाड सर,दत्ता नागणे, दत्ताभाऊ व्यवहारे,दशरथ बाबा जाधव,प्रा.मस्के सर, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांसह पंचक्रोशीतील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.