विठ्ठल कारखाना चांगला चालवण्यासाठी सभासदांनी आपली भूमिका पार पाडावी-अभिजीत पाटील
रोपळे, पांढरेवाडी येथे सभासदांची मोठी गर्दी
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : श्री विठ्ठलच्या निवडणूकीमुळे सध्या संपूर्ण पंढरपूर तालुक्यात राजकिय वातावरण ढवळून निघालेले पाहायला मिळत आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता प्रत्येक गावात झडू लागलेल्या आहेत. विठ्ठलसाठी तिरंगी लढत होणार असे जवळपास स्पष्ट झालेले असताना अजूनही विठ्ठल परिवार एक होईल अशी आशाही काहीजण व्यक्त करत आहेत. मात्र या निवडणुकीत प्रमुख विरोधक म्हणून अभिजीत पाटील यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. अभिजीत पाटील यांच्या सभांना मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सत्ताधारी गटाला घाम फुटलेला दिसत आहे.
अभिजीत पाटील यांच्या श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीची बैठक रोपळे व पांढरेवाडी या गावात पार पडली यावेळी सभासदांना उद्देशून बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की अभिजीत पाटील महत्वाचा नाही त्यापेक्षा कारखाना महत्वाचा आहे. कारखाना चांगला चालला पाहिजे व प्रत्येक सभासदाला चांगले दिवस यायला पाहिजेत. यासाठी सर्व सभासदांची महत्वाची जबाबदारी आहे. कारखाना चांगला चालावा अशी अपेक्षा असेल तर कारखान्यावर चांगली माणसे निवडून द्यावी लागतील. दोन दोन हंगाम कारखाने बंद पाडणारे आज दाखवायला काही नाही म्हणून वारसा सांगून लोकांना वेड्यात काढायचा प्रयत्न करत आहेत. मात्र ह्या बहादरांना माहीत नाही की सभासद आज शहाणा झाला आहे. तुम्ही त्यांचे पैसे बुडवुन मालकी सांगायला गेला तर तुम्हाला सभासद धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा त्यांनी दोन्ही सत्ताधारी गटांना दिला.
“भगीरथ भालके म्हणतात की कारखाना अभिजीत पाटलांनी भाड्याने मागितला होता पण तुम्हीच तो मला चालवा म्हणून मागे लागला होतात. लोकांना खोटं सांगून दिशाभूल करू नका. ही निवडणूक आपल्या घरातली आपल्या कुटुंबातील आहे. आजवरच्या निवडणूका या लोकशाही पद्धतीने लढल्या गेल्या आहेत व ही पण लोकशाही पद्धतीने लढली जावी.” अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
“मी सत्तेत आलो तर कामगारांना कामावरून काढून टाकेन असा अपप्रचार काही लोकांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे मात्र एकाही कामगाराला कमी करणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच निवडणूक वेगळ्या वळणाला जाऊ देऊ नका. बील मागितले म्हणून जनक भोसले सारख्या सभासदांला थक्काबुकी केली हे सभासद कधीच विसरणार नाहीत. समोरच्या दोन्ही गटांनी ही वैचारिक पद्धतीने निवडणूक लढवावी. तुम्ही कारखान्यासाठी पैसे कुठून उभे करणार? जप्तीची कारवाई कशी थांबवणार? हे लोकांना प्रथम दाखवून द्या मगच तुम्हाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. कारखाना चालवण्यासाठी अक्कल लागते नुसत्या वारशाने कारखाना आपोआप चालत नाही. विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून संपूर्ण पंढरपूर तालुका पुन्हा आपल्याला उभा करायचा आहे. पुन्हा अर्थक्रांती सुरू करण्यासाठी कारखाना चालू करणे गरजेचे आहे.” असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. गेल्या तीन हंगामात विठ्ठल कारखाना दोन वेळा बंद राहिल्याने सत्ताधारी गट अडचणीत आलेला आहे. त्यातच प्रमुख विरोधक असलेल्या डिव्हिपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटलांनी सत्ताधाऱ्यांना आणखी हैराण करून सोडले आहे. त्यांच्या सभांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. यावेळी रोपळे,पांढरेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.