
संपादक – दिनेश खंडेलवाल
विठ्ठल कारखाना या गळीत हंगामात १५ लाख ते २० लाख मे.टना पर्यंत गाळप करणार
श्री विठ्ठल कारखान्याचे मिल रोलर आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या हस्ते पुजन संपन्न
पंढरपूर(प्रतिनिधी):- सन २०२५-२६ गळीत हंगामाचे नियोजन पूर्ण केलेने आहे. ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांना पहिला अॅडव्हान्स हप्ता अदा केलेला आहे व दुसरा हप्ता लवकरच अदा करीत आहोत. कारखान्याची ऑफ सिझनमधील दुरुस्ती व देखभालीचे कामे प्रगतीपथावर असून गळीत हंगामामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या दृष्टीने सर्व खातेप्रमुखांनी कामकाज करुन घ्यावे, अशा सूचना देऊन कारखाना वेळेवर चालू करणेसाठी प्रयत्नशील राहावे, तसेच येत्या २०२५-२६ गळीत हंगामात कमीत कमी १५ लाख ते २० लाख मे.टना पर्यंत गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा २०२५-२६ हंगामातील मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोगे, संचालक कालिदास साळुंखे, सिताराम गवळी व विठ्ठल रणदिवे, यांचे शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन, आमदार श्री अभिजीत (आबा) पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजीत आबा पाटील म्हणाले की सर्व सभासदांनी विद्यमान संचालकावर विश्वास ठेवून कारखान्याची सुत्रे आमच्याकडे सोपविलेली आहेत. तेंव्हापासून ज्या ज्या वेळी आपणास बोलल्याप्रमाणे दिलेली सर्व अभ्यासने पाळलेली असून, यापुढेही आपल्या विश्वातास तडा जावू देणार नाही.
आपण पिकविलेल्या ऊसाची संपूर्ण नोंद ठेवून पुढील हंगामात आपले कारखान्याकडे ऊस गाळपास देवून सहकार्य करावे. मागील सन २०२४-२५ गळीत हंगामामध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्र.मे.टन रु.२८०३/-याप्रमाणे ऊसाची बिले, तोडणी व वाहतुकदार यांची कमिशनसह सर्व बिले अदा केली आहेत, तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व मयत कर्मचारी यांचे फायनल पेमेंट ठरल्याप्रमाणे अदा केलेले आहे.
कामगारांची उर्वरीत थकीत देणी यावर तोडगा काढून टप्या टप्याने अदा करणेस संचालक मंडळ कटीबद्ध आहे. सभासदांचा अपघात विमा उतरविला असून त्याचा ही फायदा सभासदांचे वारसांना मिळून देत आहोत, आपले कारखान्याचे दुर्दैवाने मयत झालेल्या पाच सभासदांच्या वारसांना विमा क्लेचा प्रत्येकी ५ लाख रुपयेचा चेक या प्रसंगी देणेत आला.
सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक संभाजी भोसले, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, महेश खटके, तज्ञ संचालक दशरथ जाधव, अशोक तोंडले, निमंत्रीत संचालक धनाजी खरात, तानाजी बागल, उमेश मोरे, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, गणेश ननवरे, कार्यकारी संचालक आर. बी. पाटील, जनरल मॅनेजर डी. आर. गायकवाड कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.