व्हॉईस ऑफ मिडीयाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पत्रकार रवि लव्हेकर
नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून सन्मान
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : महाराष्ट्रातील पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे नाव घेतले जाते. राज्यात पत्रकार आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हितासाठी प्रामुख्याने कार्यरत असणाऱ्या या संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार रवि लव्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र नवनियुक्त अध्यक्ष अभयकुमार देशमुख यांच्या हस्ते रवि लव्हेकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
पंढरपुरातील टीव्ही 9 चे पत्रकार रवींद्र लव्हेकर यांच्या नियुक्तीनंतर नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी लोहा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार तसेच भावी आमदार म्हणून ओळखले जाणारे प्रवीण पाटील चिखलीकर,स्वाभिमानीचे सागर यादव,सौदागर मोळक आदी मान्यवर उपस्थित होते.
व्हॉइस ऑफ मीडिया संघटने बाबत माहिती देताना रवींद्र लव्हेकर म्हणाले की व्हाईस ऑफ मीडिया ही ५० ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारिता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली संघटना असून भारतातील १७ राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत आहे.
कोरोनाकाळात १३६ पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा ‘व्हाईस ऑफ मीडिया’ने या १३६ पत्रकारांच्या १५० पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करून त्यांना मोठा आधार देण्याचे काम केले.
पत्रकारांचे हीत जपणारी संघटना म्हणून व्हॉईस ऑफ मिडीयाकडे पाहिले जाते. राजकारणामध्ये न अडकता पत्रकारिता आणि पत्रकारांना सक्षम करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून घडत आहे. पत्रकारांना त्यांची स्वतःची घरे उपलब्ध करून देणे, पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, आजारपण, अपघात किंवा इतर संकटकाळी पत्रकारांना आधार देण्याचे कार्य ही संघटना करीत आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये लवकरच या संघटनेचे पदाधिकारी नेमून संघटना मजबूत करण्याचे कार्यही करणार असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.