तोडफोड,जाळपोळ प्रकरणातील शेतकरी संघटनेच्या २८ जणांची निर्दोष मुक्तता
ऊसदरवाढी साठी केले होते आंदोलन;सबळ पुराव्याअभावी केली निर्दोष मुक्तता

संपादक-दिनेश खंडेलवाल
तोडफोड,जाळपोळ प्रकरणातील शेतकरी संघटनेच्या २८ जणांची निर्दोष मुक्तता
ऊसदरवाढी साठी केले होते आंदोलन;सबळ पुराव्याअभावी केली निर्दोष मुक्तता
पंढरपूर : ऊसाला दरवाढ मिळावी म्हणून २०११ साली मोठे आंदोलन झाले होते. वाखरी गावचे हद्दीतील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यालयात घुसून लोकांनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड करून तीस हजार रुपयाचे नुकसान केले होते.
दोन ट्रॅक्टर पेटवून दिल्याने टायर जाळून बावीस हजाराचे नुकसान झाले होते. कारखान्याच्या दोन कामगारांना मारहाण झालेली होती. तसेच ऊसाने भरलेल्या पंधरा ट्रॅक्टरच्या काचा, टायरे फोडून नऊ लाख रुपयाचे नुकसान केले होते. कार्यालयाचे आवारातील कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाच बसेसवर तसेच पांडुरंग करखान्याच्या जीपवर दगडफेक करून काचा व इतर पार्टस मोडून तोडून तीन लाख पन्नास हजाराचे नुकसान झाले होते.
याबाबत शिवीगाळ मारहाण करून मोडतोड जाळपोळ करून नुकसान केलेबद्दल पांडुरंग सहकारी कारखान्याचे शेती अधिकारी रवींद्र साळुंखे यांनी पंढरपूर तालुका पोलिसात फिर्याद दिलेली होती.
त्याप्रमाणे पोलिसांनी शेतकरी संघटनेचे समाधान फाटे ,तानाजी बागल,अतुल नागणे,नवनाथ नागणे, औदुंबर भोसले,सुभाष शिंदे,चंद्रकांत बागल, बाळासाहेब जगदाळे वगैरे उपरी ,गादेगाव ,वाखरी परिसरातील एकूण अठ्ठावीस लोकांविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमा अन्वये तपास करून गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान त्याबाबतचे आरोपपत्र पंढरपूर फौजदारी न्यायालयात दाखल केले होते. त्याची चौकशी होऊन आणि सर्व आरोपींचे वकील विजयकुमार नागटिळक यांचा युक्तिवाद ग्राहय धरून सर्वांचीच या गुन्ह्यांतून सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.