माघ यात्रेतील वारकरी भाविकांच्या सोईसाठी मंदिर समिती सज्ज
सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य देणार - गहिनीनाथ महाराज औसेकर

संपादक-दिनेश खंडेलवाल
माघ यात्रेतील वारकरी भाविकांच्या सोईसाठी मंदिर समिती सज्ज
सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य देणार – गहिनीनाथ महाराज औसेकर
दर्शनरांगेत कार्तिकी प्रमाणेच राहणार सोई सुविधा;यंदा प्रथमच पत्राशेड येथे अन्नछत्र
पंढरपूर : पंढरपूरात दरवर्षी प्रमाणे यंदाही माघ यात्रा ही माघ महिन्यातील शुद्ध एकादशीस साजरी केली जाईल. सन २०२४ यावर्षी माघ एकादशी मंगळवार दि.२० फेब्रुवारी रोजी आहे. त्याचा कालावधी दि.१४ ते २६ असा आहे. या यात्रेला अंदाजे ४ ते ५ लाख भविक पंढरपूर शहरात असतात. या भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालिन गेट, विश्रांती कक्ष, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर, चहा – खिचडी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
दर्शनरांगेतील भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शनासाठी प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी पुजांची संख्या कमी करून स.६ ते रा.१२ पर्यंत दर्शन उपलब्ध राहणार आहे. दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालविण्यासाठी दर ५० मीटर अंतरावर पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच या यात्रा कालावधीत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येणार असून त्याबाबतचे आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ह.भ.प. वासकर महाराज यांच्या दिंडीची नवमीला श्री.विठ्ठल सभामंडप येथे आरती व अभंग,ह.भ.प.आजरेकर महाराज पंढरपूर यांचा द्वादशीला नैवेद्य, त्रयोदशीला ह.भ.प.औसेकर महाराज यांच्या चक्रीभजनाची परंपरा असून, एकादशीला पहाटे श्रींची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य महोदयांच्या शुभहस्ते सपत्नीक संपन्न होत आहे.
याशिवाय, सोलापूर महानगरपालिका यांचेकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचा-यासह, सिझफायर यंत्रणा, अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, मोबाईल लॉकर, चप्पल स्टँड, सार्वजनिक प्रसारण सुचना प्रणाली, चौकशी कक्ष, बँग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलीसी इ. व्यवस्था करण्यात आली आहे.
–आरोग्य सेवा–
पत्राशेड येथे तालुका आरोग्य विभागाचा वैद्यकीय कक्ष, उपजिल्हा रूग्णालया मार्फत दर्शनमंडप येथे आयसीयू तसेच माळवदावर वैष्णव चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्याकडून मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे. मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह दोन अद्यावत रूग्णवाहिका ठेवण्यात येत आहेत.
–स्वच्छता व्यवस्था–
मंदिर, दर्शनमंडप, तुकाराम भवन येथील स्वच्छता मंदिर कर्मचा-यांमार्फत व नगरप्रदक्षिणा, दर्शनरांग, मंदिर प्रदक्षिणा इ. ठिकाणची स्वच्छता करण्यात येत आहेत. या कामी स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात येत असून, स्वच्छतेसाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे.
—-अन्नदान—
श्री.संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये दु १२ ते २ व रा.७ ते ९ या वेळेत अन्नदान सुरू राहणार असून, दर्शनरांगेत दशमी, एकादशी, द्वादशीला चहा-शाबुदाणा/तांदळाची खिचडी तसेच पत्राशेड येथे यंदा प्रथमच अन्नछत्र सुरू करण्यात येत आहे.
–लाईव्ह दर्शन व्यवस्था–
मंदिर समितीचे संकेतस्थळ मोबाईल अॅप वरून श्रीचे लाईव्ह दर्शन उपलब्ध असून पत्राशेड येथे एल.ई.डी. स्क्रिन बसविण्यात येत आहे. याशिवाय देणगी घेण्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती, ऑनलाईन देणगीसाठी क्यू आर कोड, आरटीजीएस, सोने-चांदी वस्तु दान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच महिला भाविकांच्या सोईसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्ष, चेंजिंग रूम तसेच श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी लाडूप्रसाद व त्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच वेदांता, व्हीडीओकॉन व श्री.विठ्ठल रूक्मिणी या ३ भक्तनिवासामधील ३६१ रूममध्ये सुमारे १६०० भाविकांची निवास व्यवस्था करण्यात येत आहे.
सदर यात्रा निर्विघ्नपणे – सुरळीत पार पाडण्यासाठी भाविकांना केंद्रबिंदू मानून त्यांना अधिकांधिक सोई सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंदिर समितीचे सदस्य आ.रामचंद्र कदम, श्रीमती शकुंतलाताई नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड.माधवीताई निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड परिश्रम घेत असून १२०० कर्मचारी व स्वयंसेवक सेवा पार पाडणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी यांनी दिली.