
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरीत खड्डेदुरुस्तीसाठी भालकेंनी उठवला आवाज
प्रशासनाने दखल घेत केली रस्त्याची दुरुस्ती
पंढरपूर : पंढरपूर शहरातील संतपेठ परिसरातून मंगळवेढ्याकडे जाणाऱ्या मार्गावर ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्त्यावर खोदकाम करण्यात आले. त्याठिकाणी रस्त्यावर मोठा खड्डा पडला होता. खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. या मार्गावरून जाताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच या परिसरातील नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत येथील नागरिकांनी खड्डा बुजवण्याची मागणी प्रशासनाकडे वारंवार केली होती. मात्र माघवारीच्या कामात व्यस्त असल्याचे दाखवणाऱ्या प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
याचबरोबर आपल्या मर्जीतील अधिकारी आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व या मार्गावरून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन प्रशासनाला रस्ता दुरुस्तीबाबत सूचना देणे गरजेचे असतानाही लोकप्रतिनिधींनी खड्ड्याकडे दुर्लक्ष करत दुसरी कडून मार्ग काढणे पसंत केल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर ऐकवयास मिळत आहे.
याबाबत येथील नागरिकांनी युवक नेते भगीरथ भालके यांच्याशी संपर्क साधून आपल्या व्यथा मांडल्या. यानंतर प्रणिताताई भालके यांनी सदर ठिकाणी भेट देऊन समस्या जाणून घेऊन ती सोडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क साधून नागरिकांच्या समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देण्याची मागणी केली.
दरम्यान भगीरथ भालके यांनी तात्काळ मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधत नागरिकांच्या तक्रारीची दखल घ्यावी. अन्यथा वेगळ्या मार्गाने आंदोलन करावे लागेल अशा शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले. भगीरथ भालके यांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही तासातच सदर मार्गावरील खड्डे प्रशासनाने दुरुस्त करून नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतल्याने वाहनधारकांतून आणि परिसरातील नागरिकांकडून भालके पती-पत्नी यांचे आभार मानले जात आहे.