माघ यात्रेच्या जया एकादशी साठी पंढरीत भाविकांची मांदियाळी
यात्रेच्या सोहळ्यासाठी सुमारे चार लाख भाविक पंढरीत दाखल

संपादक-दिनेश खंडेलवाल
माघ यात्रेच्या जया एकादशी साठी पंढरीत भाविकांची मांदियाळी
यात्रेच्या सोहळ्यासाठी सुमारे चार लाख भाविक पंढरीत दाखल
पंढरपूर : “जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा” तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या बाबतीत अशी आख्यायिका पूर्वापार सांगितली जात आहे. या आख्यायिकेप्रमाणेच पंढरपुरात वर्षाकाठी चार यात्रा भरतात वर्षातील पहिली यात्रा म्हणजेच माघ यात्रा या यात्रेतील जया एकादशीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चार लाख भाविकांची मांदळी पंढरपुरात दाखल झाली आहे.
पंढरपुरात आलेला प्रत्येक भाविक प्रथम पवित्र चंद्रभागेत स्नान करून विठ्ठल दर्शन घेऊन नामदेव पायरीचे दर्शन घेऊन शहर प्रदक्षिणा केल्यानंतरच वारी पोहोच झाल्याचा समाधान व्यक्त करतो. महाराष्ट्रा मधील वारकरी संप्रदायामध्ये तीर्थक्षेत्र पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन करून वारी पोहोच करण्याची परंपरा आहे.
पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदी आणि वाळवंट परिसर 65 एकर प्रदक्षिणामार्ग भक्ती मार्ग आदी विविध भागातील मठामधून भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. त्याचबरोबर हरिनामाचा गजर, टाळ मृदंगाचा निणाद आणि कीर्तनाच्या आवाजाने अवघी पंढरपूर नगरी दुमदुमून गेली आहे.
वारकरी भाविकांसाठी टाळ मृदुंगाची दुकाने, विना, पखवाज,प्रसादिक दुकाने, अष्टगंध,कुंकू,बुक्का सह खेळण्याची दुकाने लहान मोठ्यांचे कपडे विक्री करण्याचे, तसेच विविध प्रकारच्या उपयोगी वस्तूंची दुकाने सजली आहेत. पंढरपूर नगरपरिषद प्रशासन,पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन,मंदिर प्रशासन, अन्न व औषध प्रशासन,आरोग्य प्रशासन आदी प्रशासनाने भाविकांच्या सेवेसाठी आपापल्या परीने तयारी केली असून भाविकांना सुविधा देण्यासाठी सज्ज आहेत.