देगाव येथील संध्यावळी देवी परिसर पर्यटन स्थळ म्हणून घोषित
सरपंचांच्या यशस्वी पाठपुरव्याला खा. निंबाळकरांची साथ

संपादक-दिनेश खंडेलवाल
देगाव येथील संध्यावळी देवी परिसर पर्यटन स्थळ म्हणून घोषित
सरपंचांच्या यशस्वी पाठपुरव्याला खा. निंबाळकरांची साथ
पर्यटन संचालनालयाचा सुमारे पाच कोटी रुपये निधी मंजूर
पंढरीच्या भाविक व पर्यटकांसाठी ठरणार आकर्षण बिंदू
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील अतिशय गतिमान व कार्यक्षम ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या देगाव ग्रामपंचायतीला पर्यटन क्षेत्र विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. देगाव गावातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र अशी ओळख असलेला श्री संध्यावळी देवी मंदिर परिसर महाराष्ट्र शासनाकडून पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्राच्या पर्यटन संचलनालयाकडून सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यापैकी सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील बेट अशी ओळख असलेला हा संध्यावळी देवी मंदिर परिसर आता नव्याने आणखी खुलून येणार आहे.
मंदिर परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी देगावच्या सरपंच सौ.सीमा संजय घाडगे व देगाव ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने महाराष्ट्र पर्यटन विभाग,पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा,खा. रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे गेल्या अनेक महिन्यांपासून यशस्वी पाठपुरावा केला होता. तसेच माढा मतदासंघांचे आ. बबन दादा शिंदे व माजी आ. प्रशांत परिचारक यांचेही यासाठी मोलाचे सहकार्य लाभले होते. देगाव ग्राम पंचायतीच्या मागणी नंतर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्राद्वारे या पर्यटन स्थळासाठी पर्यटकांच्या मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. नुकत्याच झालेल्या अर्थ संकल्पात त्यास पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांनी प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. या भागातल्या अनेक लोकांची, गावकऱ्यांची ही मागणी होती.या निधीमुळे या परिसरातील पर्यटक वाढीस चालना मिळणार व रोजगार वाढीस मदत होणार आहे.
पंढरपूर पासून अवघ्या ५ किमी अंतरावर असलेल्या देगाव येथे श्री संध्यावळी देवीचे मंदिर आहे. हा परिसर अतिशय निसर्गरम्य असून या परिसरास चहूबाजूंनी पाण्याने वेडा घातलेला आहे. त्यामुळे हा परिसर बेट या नावानेही प्रसिद्ध आहे. हा परिसर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित व्हावा यासाठी देगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गेल्या वर्षभरापासून प्रयत्न चालू होते. त्यातच हा निधी मंजूर झाल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच देगाव ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्यावतीने पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.बबन दादा शिंदे माजी आ. प्रशांत परिचारक यांचेही आभार व्यक्त केले आहे. या परिसर मुळातच निसर्गरम्य असून याठिकाणी आणखी खास सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊ शकतो.
[“गेल्या दोन वर्षात आमच्या ग्रामपंचायत बॉडीमार्फत गावात जास्तीत जास्त जन विकासाची कामे करण्यावर आमचा भर राहिला आहे.आमचे ग्रामदैवत श्री संध्यावळी देवी मंदिर परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावा यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रामाणिक प्रयत्न चालू होते.अतिशय निसर्गरम्य परिसर असूनही हा परिसर मूलभूत विकासापासून वंचित राहिला होता.मात्र आज त्या प्रयत्नांना यश आले आहे.हे सर्व देगावकरांचे यश असून यासाठी आपले पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा,खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माजी आ.प्रशांत परिचारक,आ.बबनदादा शिंदे,सर्व शासकीय अधिकारी,ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
सौ.सीमा संजय घाडगे
सरपंच देगाव ग्रामपंचायत]