पंढरपूर तालुक्यात पुन्हा अर्थक्रांती सुरू करण्यासाठी कारखाना चालू करणे गरजेचे आहे-अभिजीत पाटील
पंढरपूर तालुका पुन्हा उभा राहायचा असेल तर विठ्ठल चांगला चालला पाहिजे!

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील अर्थ दायिनी समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्या हितासाठी या निवडणुकीत विठ्ठल सहकारी साखर कारखाना योग्य व्यक्तीकडे जावा यासाठी प्रत्येक जण आपल्या पॅनलच्या विजयासाठी मोर्चेबांधणी करताना दिसत आहे. यावेळी बोलताना श्रीविठ्ठल परिवर्तन विकास आघाडीचे अभिजित पाटील म्हणाले की “ही निवडणूक वेगळ्या वळणाला जाऊ देऊ नका. समोरच्या दोन्ही गटांनी ही निवडणूक वैचारिक पद्धतीने लढवावी. तुम्ही कारखान्यासाठी पैसे कुठून उभे करणार? जप्तीची कारवाई कशी थांबवणार? हे लोकांना प्रथम दाखवून द्या मगच तुम्हाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून संपूर्ण पंढरपूर तालुका पुन्हा आपल्याला उभा करायचा आहे. पुन्हा अर्थक्रांती सुरू करण्यासाठी कारखाना चालू करणे गरजेचे आहे. हे वारसदार नुसते वारसा सांगत फिरतात यांना एखादं दुकान टाकता येईना, एखादी टपरी टाकता येईना, एखादं पंक्चर दुकान टाकता येईना आणि ह्यांनी मापं कुणाची काढावीत. असा घणाघात त्यांनी भगीरथ भालके व युवराज पाटील या दोन्ही गटाचे नाव न घेता केला तसेच विठ्ठल कारखान्याचा सभासद समृद्ध आणि सुखी करण्याचा मानसही त्यांनी यावेळी बोलताना सभेत व्यक्त केला.
श्री विठ्ठलच्या निवडणूकीमुळे सध्या संपूर्ण पंढरपूर तालुक्यात राजकिय धुरळा उडालेला पाहायला मिळत आहे. आता प्रत्येक गावात गल्ली बोळात केवळ विठ्ठलचीच चर्चा चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या तीन हंगामात विठ्ठल कारखाना दोन वेळा बंद राहिल्याने सत्ताधारी गट अडचणीत आलेला आहे. त्यातच प्रमुख विरोधक असलेल्या युवा नेतृत्व अभिजीत पाटलांनी सत्ताधाऱ्यांना आणखी हैराण करून सोडले आहे. त्यांच्या सभांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव,सिद्धेवाड येथे त्यांची बैठक पार पडली त्यावेळी विठ्ठलच्या सभासदांना उद्देशून ते बोलत होते.
“ही निवडणूक आपल्या घरातली, आपल्या कुटुंबातील आहे. आजवरच्या निवडणूका या लोकशाही पद्धतीने लढल्या गेल्या आहेत व ही पण लोकशाही पद्धतीने लढली जावी. आपल्या कुटुंबात जर थोरला कारभारी चुकला तर धाकट्याला कारभार दिला जातो इथे तर थोरल्याने कुटुंबच अडचणीत आणले आहे मग त्याला पुन्हा संधी का द्यायची? एकदा धाकटा कारभारी व या कुटुंबातील सदस्य म्हणून माझ्याकडे एकदा कारभार देऊन बघा असे कळकळीचे आवाहन त्यांनी सभासदांना यावेळी केले.
यावेळी यावेळी पंचायत समितीचे मा.सभापती विष्णु बागल,पंढरपूर माजी नगराध्यक्ष सुभाष दादा भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, जिल्हाध्यक्ष रयत क्रांती संघटना दिपक भोसले, संचालक दिनकर चव्हाण, विठ्ठल सह.साखर कारखान्याचे मा.संचालक राजाराम सावंत, तालुका अध्यक्ष सचिन पाटील तसेच कासेगाव, सिद्धेवाडी येथील शेतकरी सभासदांनी मोठी गर्दी केली होती.