मुख्य संपादक-दिनेश खंडेलवाल
महेंद्र गायकवाड ठरला
“मनसे केसरी”चा मानकरी
दिल्लीच्या आशिष हुड्डाला घुटना डावावर केले चितपट
मनसेचे अमित ठाकरे, दिलीप धोत्रेंनी दिली मानाची गदा व पाच लाख रुपये रोख बक्षीस
पंढरपूर(प्रतिनिधी):- मंगळवेढा येथे ‘मनसे केसरी २०२४’ साठी महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड व छत्रसाल स्टेडियम दिल्लीचे आशिष हुड्डा यांच्यात झालेल्या रोमांचक लढतीत पैलवान महेंद्र गायकवाड हा ‘मनसे केसरी’ चा मानकरी ठरला. दहा मिनिटे चाललेल्या या कुस्तीत पैलवान महेंद्रने घुटना डाव टाकत हुड्डा यांना चितपत करत
मैदान मारताच उपस्थित कुस्तीप्रेमींनी मोठा जल्लोष केला.
मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या माध्यमातून मंगळवेढा येथे मनसे केसरी २०२४ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती आखाड्याचे उद्घाटन मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, मनसे तालुका प्रमुख नारायण गोवे, जिल्हा उपप्रमुख चंद्रकांत पवार, कोल्हापूरचे पवन महाडिक, दादा धोत्रे, मंगळवेढा तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष दामोदर घुले, कुस्ती आखाडा प्रमुख मारुती वाकडे, महेंद्र देवकते, मुरलीधर सरकळे आदी मान्यवर उपस्थित होते.
१९८८ चे उपमहाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर व पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष वामन बंदपट्टे यांनी काम पाहिले. मनसे केसरी २०२४ चे विजेते पैलवान महेंद्र गायकवाड यांना मानाची गदा व पाच लाख रुपये रोख रकमेचे पारितोषिक मनसे नेते अमित ठाकरे, संयोजक दिलीप धोत्रे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. मनसे नेते या कुस्तीचे पंच म्हणून अमित ठाकरे यांचा सत्कार विठ्ठलरुक्मिणी मातेची मूर्ती देऊन करण्यात आला.
दोन लाख रुपये बक्षिसासाठी माऊली जमदाडे व बारामती येथील भारत मदने यांच्यात लढत झाली. माऊली जमदाडे यांनी भारत मदने याच्यावर मात केली. एक लाख रुपये बक्षिसासाठी प्रसाद सस्ते व संग्राम साळुंखे यांच्यातील कुस्ती जोडीवर सोडण्यात आली. तर दिग्विजय वाकडे व अनिल मळगे यांच्यात लढत होऊन वाकडे विजयी झाले. प्रमुख पंच म्हणून समाधान घोडके, मारुती वाकडे, भीमराव माळी, दामोदर घुले, महेंद्र देवकते यांनी काम पाहिले.
मनसे केसरी २०२४ या कुस्ती आखाड्यात स्थानिक मल्लापासून राष्ट्रीय मल्लांनी कुस्तीचा खेळ दाखवत कुस्ती शौकिनांची मने जिंकली.
तात्या जुमाळे व विजय शिंदे यांच्यात लढत होऊन विजय शिंदे पॉईंटवर विजयी झाले.
पंच्याहत्तर हजार रुपये बक्षिसासाठी ज्योतिबा आटकळे व संग्राम अस्वले यांच्यात लढत होऊन एक चाक डावावर ज्योतिबा आटकळे विजयी झाले.
पन्नास हजार रुपये बक्षिसासाठी सौरभ घोडके व सुनील हिप्परकर यांच्यात लढत झाली. जोडीवर कुस्ती सोडवण्यात आली.
यावेळी अर्जुन अवॉर्ड विजेते हिंद केसरी, रूस्तम-ए- हिंद महासम्राट, कुस्ती सम्राट, भारत भीम, तसेच महाराष्ट्र केसरी, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त, ऑल इंडिया चॅम्पियन, महाराष्ट्र चॅम्पियन, राष्ट्रकुल सुवर्ण पद विजेते, तसेच राज्याच्या विविध भागातील पैलवान व हजारो कुस्ती शौकीन यांनी उपस्थित राहून कुस्ती स्पर्धेतील कुस्तीपटूंना प्रोत्साहन दिले. यावेळी धनाजी मदने व अशोक धोत्रे यांनी निवेदन करीत उपस्थितांची मने जिंकली.