सिताराम महाराजांचे दर्शन घेऊन दिलीप धोत्रे यांची खर्डी येथुन प्रचाराची सुरुवात
मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांच्या उपस्थितीत फोडला प्रचाराचा नारळ

संपादक-दिनेश खंडेलवाल
सिताराम महाराजांचे दर्शन घेऊन दिलीप धोत्रे यांची खर्डी येथुन प्रचाराची सुरुवात
मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांच्या उपस्थितीत फोडला प्रचाराचा नारळ
पंढरपूर(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलेले राज्यातील मनसेचे पहिले उमेदवार असलेले मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी
विधानसभेची मोर्चे बांधणी केल्यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून प्रचाराचा शुभारंभ केला आहे. त्यांनी पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सिताराम महाराजांचे दर्शन घेऊन प्रचारास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत मतदार संघातील मतदार, मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या दहा वर्षापासून त्यांनी मतदारांशी संपर्क वाढवला होता. यादरम्यान विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवले असून अनेक ठिकाणी मतदारसंघातील कामे केली. त्याचबरोबर मतदारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर वाचा फोडून प्रसंगी आंदोलन ही केले.
त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघातील विविध भागात मनसे, पदाधिकारी, कार्यकर्ते , मित्र परिवार यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला असून मनसेचा उमेदवार म्हणून निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
घटस्थापनेच्या या शुभ मुहूर्तावर मतदार संघातील सर्व सामान्य जनतेचे श्रध्दास्थान संत सिताराम महाराज यांच्या खर्डी येथिल मंदिरात श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन श्रीफळ अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ केला.
याप्रसंगी खर्डी येथुन प्रचार शुभारंभ सभेत बोलताना ते म्हणाले की मी दगड फोड्याचा मुलगा आहे. प्रस्थापितांचा सत्तेचा माज उतरवल्या शिवाय गप्प रहाणार नाही. आज सभेत त्यांनी सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढले. महिला व युवकांसाठी मनसे तर्फे विविध माध्यमांतून मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. समाजातील सर्व सामान्य महिला वर्ग यांना स्वबळावर उद्योग, व्यवसायसाठी मनसे तर्फे विशेष सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच शेतकरी,कष्टकरी,तरुण बेरोजगारांच्या समस्या कायमच्या संपवण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे असेही त्यांनी बोलताना सांगितले आहे.
खर्डी येथील प्रचारसभेस प्रमुख उपस्थित नाना कदम,वकील यासीन शेख ,शशीकांत घाडगे, संतोष कवडे, वकील संदिप रननवरे,संतोष रणवरे,अमर कुलकर्णी, अनिल केदार, राजु बाबर,गणेश पिंपळणेकर, नागेश इंगोले, दत्तात्रय वलेकर, बाबा चव्हाण, प्रशांत बंडगर, औदुंबर शेळके तसेच मनसेचे असंख्य कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.