ईतर

पंढरपूर माढ्याचे उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात

राष्ट्रवादी पक्षाच्या पहिल्या यादीत माढा, पंढरपूर मतदारसंघ नाही

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरपूर माढ्याचे उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात

राष्ट्रवादी पक्षाच्या पहिल्या यादीत माढा, पंढरपूर मतदारसंघ नाही

पंढरपूर/ दिनेश खंडेलवाल:- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ तसेच माढा मतदारसंघात उमेदवारांची धाकधूक वाढली असून या मतदार संघाची नावे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत नसल्यामुळे या ठिकाणी कोणता उमेदवार जाहीर होणार? याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.

252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडे तुतारी चिन्हासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल दादा सावंत यांनी उमेदवारीची मागणी केली असून आपल्याला उमेदवारी मिळणार याची शंभर टक्के खात्री असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. तर स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ दादा भालके यांनी लोकसभेत काँग्रेस पक्षाला मदत केल्यामुळे या मतदारसंघातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी तयारी पूर्ण केली असून उमेदवारीसाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले असल्याचे बोलले जाते. दरम्यान भाजपाचे लोकसभेतील क्लस्टर प्रमुख व विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शिष्टमंडळांनीही शरद पवार यांच्या गाठीभेटी घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. त्याचबरोबर मतदार संघात घोंगडी बैठका घेऊन मतदारांची मागणी विचारात घेता तुतारी कडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले त्यांनाही उमेदवारी आपल्यालाच मिळणार अशी खात्री असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमधूनही उत्साह दिसून येत आहे.

परंतु आज प्रसिद्ध झालेल्या भाजपा व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या पहिल्या यादीमध्ये माढा मतदारसंघ तसेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे नाव नसल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली असून कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

माढा मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे भाजपाचे रणजीत सिंह मोहिते पाटील किंवा शिवतेसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी मोहिते पाटील गट प्रयत्नशील असून त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असल्याचे बोलले जाते. तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी माढ्यातून उमेदवारी मिळावी म्हणून शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत समाधानकारक चर्चा झाल्याचे कार्यकर्त्यातून सांगितले जाते. या मतदारसंघात त्यांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जोरदार मोर्चे बांधणी केली असून विरोधकांना घाम फोडला असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. माढा मतदारसंघांमध्ये बबन दादा शिंदे हे विद्यमान आमदार असून त्यांनीही आपला चिरंजीव रंणजीत शिंदे याच्यासाठी या मतदारसंघातून शरद पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली आहे.

माढा आणि पंढरपूर या दोन्हीही मतदार संघात तुल्यबळ उमेदवारांनी मागणी केली असल्याने या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिल्यानंतर आपला उमेदवार निवडून येणार आहे. याबाबत पक्षाने स्थानिक पातळीवरून माहिती घेतली असून कोणाला उमेदवारी देणे फायदेशीर ठरेल याचा पूर्ण अभ्यास करूनच दोन्ही ठिकाणची उमेदवारी जाहीर होणार आहे. मात्र सध्या तरी पहिल्या यादीत दोन्ही मतदारसंघातील नावे नसल्याने उमेदवारांची धाकधूक वाढल्याचे दिसून येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close