पत्रकारांनी बातम्यांच्या धावपळीत आरोग्याकडे लक्ष द्यावे – प्रांताधिकारी सचिन इथापे
आरोग्य तपासणीमुळे असाध्य रोगाची माहिती मिळते - डॉ. वर्षा काणे

संपादक – दिनेश खंडेलवाल
पत्रकारांनी बातम्यांच्या धावपळीत आरोग्याकडे लक्ष द्यावे – प्रांताधिकारी सचिन इथापे
आरोग्य तपासणीमुळे असाध्य रोगाची माहिती मिळते – डॉ. वर्षा काणे
पंढरपूर(प्रतिनिधी):- समाजात घडत असलेल्या विविध घडामोडीच्या बातम्यांसाठी पत्रकार हे नेहमीच धावपळ करीत असतात. बातमी करताना वेळेवर जेवण न करणे, आपल्या परिवाराकडे कुटुंबाकडे दुर्लक्ष होणे असे प्रसंग अनेक वेळा त्यांच्यावर येतात. परंतु पत्रकारांनी बातम्यांच्या धावपळीत आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे अशी प्रतिक्रिया प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी पत्रकारांसाठी घेण्यात आलेल्या सर्व रोग निदान शिबिराप्रसंगी व्यक्त केली.
मराठी पत्रकार संघ संलग्न पंढरपूर पत्रकार संघ व डॉ. काणेज् गायत्री सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पत्रकारांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून प्रांताधिकारी सचिन इथापे बोलत होते. प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉक्टर महेश सुडके, पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, डॉक्टर सुरेंद्र काणे, डॉक्टर सौ. वर्षा काणे, हृदयरोग तज्ञ डॉ.बसवराज सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ असून समाजात घडणाऱ्या विविध घडामोडी तसेच समाजमनावर प्रकाश टाकण्यासाठी बातम्या करताना पत्रकारांची मोठी धावपळ होते. चाळीस वर्षानंतर प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. वेळी अवेळी बाहेर खाणे, उशिरा झोपणे, सकाळी लवकर उठून वृत्तपत्र व इतर कामासाठी बाहेर पडणे, यामुळे त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते.
तरी पत्रकारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. आज या ठिकाणी संपूर्ण शरीराचे चेकअप मोफत ठेवण्यात आल्यामुळे या संधीचा सर्व पत्रकारांनी लाभ घ्यावा. आपल्याला कोणताही रोग होऊ नये यासाठी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. आरोग्याची अगोदरच तपासणी केल्यामुळे प्रत्येक पत्रकाराला याचा फायदा होईल. सर्व रोग निदान शिबिराच्या माध्यमातून पत्रकारांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. या निर्णयाला प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी प्रतिसाद दिला.
आरोग्य तपासणीमुळे असाध्य रोगाची माहिती मिळते……….
इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया,यूट्यूब, पोर्टल यामुळे सध्या पत्रकार हे एखाद्या महत्त्वाच्या बातमीसाठी नेहमीच धावपळ करताना दिसून येतात. परंतु अशावेळी अचानक कोणताही त्रास उद्भवल्या नंतरच ते रुग्णालयांमध्ये किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे तपासणीसाठी जातात. आज सर्व रोग निदान शिबिराच्या माध्यमातून पत्रकारांनी योग्य निर्णय घेऊन सर्व रोग निदान तपासणी केल्यामुळे एखाद्या असाध्य रोगाची पूर्वकल्पना या आरोग्य तपासणीतून पुढे येते व त्याच्यावर वेळेतच उपचार करता येते. अनेक वेळा त्रास होऊनही बरेच जण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. वेळेत तपासणी करून घेत नाही यामुळे गंभीर समस्येला तोंड द्यावे लागते. परंतु आपल्या नंतर आपल्या परिवाराचे काय असा विचार केला तर प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेऊन कोणताही त्रास होऊ लागताच वेळेत तपासणी करून घेतल्यास डॉक्टरांकडून योग्य उपचार सुरू करून निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. यावेळी अनेक रुग्णांबाबत त्यांनी माहिती देऊन आरोग्य शिबिराचा लाभ किती महत्त्वाचा आहे हे डॉ. वर्षा काणे यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांचा सन्मान करून आरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी ५७ पत्रकारांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिर यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार संघ संलग्न पंढरपूर पत्रकार संघ पदाधिकारी व सदस्य तसेच गायत्री सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.