पंढरपूर वारीला निघालेल्या दिंडीत घुसली कार सात वारकऱ्यांचा मृत्यू आठ जखमी
मृत कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथील वारकरी
संपादक दिनेश खंडेलवाल
पंढरपूर वारीला निघालेल्या दिंडीत घुसली कार सात वारकऱ्यांचा मृत्यू आठ जखमी
मृत कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथील वारकरी
पंढरपूर : पंढरपूर येथे कार्तिक यात्रेच्या सोहळ्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पायी दिंडी पंढरीच्या दिशेने येत असताना सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ दिंडीत भरधाव वेगाने टाटा नेक्सन कार घुसल्याने सात वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये आठ जण गंभीर जखमी झाल्याचे समजते.
मृतांमधील सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी येथील असल्याचे माहिती पुढे येत आहे.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ पंढरपूरच्या दिशेने कार्तिक यात्रेच्या सोहळ्यासाठी पायी दिंडी येत असताना पाठीमागून भरधाव कार दिंडीमध्ये घुसून त्या कारने वारकऱ्यांना चिरडल्यामुळे सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून आठ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील हे वारकरी पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी व कार्तिक यात्रेच्या सोहळ्यासाठी पायी निघाले होते दरम्यान सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ सायंकाळच्या सुमारास पंढरपूर कडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव टाटा नेक्सन कार घुसल्याने झालेल्या अपघातात पंधरा वारकरी गंभीर जखमी झाले होते. यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश असल्याचे समजते तर आठ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये भरधाव वेगाने घुसलेल्या टाटा नेक्सन कार मधील दोघांना सांगोला पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील एक व्यक्ती ही सांगोला तालुक्यातील सोनंद या गावातील रहिवासी असल्याचे समजते सदर घटनेचा अधिक तपास सांगोला पोलीस करीत आहेत.
[मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा–
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.]