
संपादक – दिनेश खंडेलवाल
चंद्रभागेत उजनी धरणातून १ लाख ५१ हजार ६०० तर वीर मधून १५ हजार ३२४ क्युसेक विसर्ग
पुराचा धोका लक्षात घेवून आणखी १०० कुंटुंबाचे होणार स्थलांतर
• शहरातील चंद्रभागा नदी काठावरील १३७ कुंटुंबाचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
• संगम येथून १ लाख ९५ हजार ८६१ विसर्ग
पंढरपूर(प्रतिनिधी):- वीर व उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामूळे भीमा नदीला पूर आला आहे. भीमा नदी इशारा पातळी ओलांडून धोकादायक पातळीवर वाहत आहे. उजनी धरणातून सायंकाळी ६ वाजता १ लाख ५१ हजार ६०० क्युसेक तर वीर धरणातील विसर्ग कमी करुन १५ हजार ३२४ क्युसेक करण्यात आला आहे. पंढरपूर येथील चंद्रभागेत नदी १ लाख ४४ हजार ४९८ क्युसेकने पाणी वाहत असल्याने शहरातील चंद्रभागा नदी काठावरील १३७ कुंटुंबाचे सुरक्षितस्थळी प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आले आहे.
संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेवून तालुक्यात गावपातळीवर तसेच पंढरपूर शहरात आपत्ती निवारणार्थ यंत्रणा गतिमान केली आहे. यापूर्वीच्या आपत्ती धोक्याचा अभ्यास करुन त्या ठिकाणी आवश्यकती खबरदारी घेण्यात आली आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने तालुक्यातील नदीवरील आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीवर दगडी पूल व गोपाळपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे.
नदी काठावरील नागरिकांनी व पंढरपूर शहरातील नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. तसेच आपत्तीकालिन परिस्थिचा मुकाबला करण्यासाठी लोकसहभागही महत्वाचा असल्याचेही प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.
शहरातील चंद्रभागा नदी काठावरील व्यास नारायण झोपडपट्टी येथील ८० कुटुंबांचे तर अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील ५७ कुटुंबांचे आज दुपारी स्थलांतर करण्यात आले आहे. तर येथील ४०० पेक्षा जास्त लोक त्यांच्या सोईने इतरत्र त्यांच्या पै पाहुण्यांच्या घरी, नातेवाईकांच्या घरी स्थलांतरीत झाली आहेत.
सायंकाळी ५ वाजता संगम येथून १ लाख ९५ हजार ८६१ विसर्ग सुरु असून, हा विसर्ग पंढरपूरात रात्री दाखल होणार असल्याने व्यास नारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील आणखी १०० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
भीमा नदीला पूर आल्याने ४० हजार क्युसेकला कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर १ लाख ७ हजार क्युसेकला पंढरपूर मंगळवेढा रोडवरील गोपाळपूर येथील जुना पूल पाण्याखाली गेला. तर १ लाख १५ हजार क्युसेकला व्यासनारायण झोपडपट्टीत पाणी शिरले आहे.
तर १ लाख ६० हजार क्युसेकला गोपाळपूर येथील नवीन पुल पाण्याखाली जातो. तसेच १ लाख ८० हजार क्युसेकला संत पेठेत पाणी शिरते. सुरक्षेसाठी नागरिकांना प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येत असून नागरिकांनी सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.