मंदिर समितीच्या आस्थापनेवरील कर्मचा-यांना शासनाच्या स्थायी कर्मचा-यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करा
अन्यथा जूलै 2022 पासून आंदोलन करण्याचा दिला इशारा
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या आस्थापनेवरील कर्मचा-यांना महाराष्ट्र शासनाच्या स्थायी कर्मचा-यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करण्याबाबत मंदिर समितीचे सह अध्यक्ष व कार्यकारी अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन व समक्ष भेट घेवून चर्चा केली होती. त्यावेळी मंदिर समिती ही कर्मचा-यांना वेतन व भत्ते वाढवून देण्यास अनुकुल व सकारात्मक आहे. याबाबत मंदिर समितीच्या दि. २५/०३/२०२२ रोजीच्या सभेत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
या आश्वासनास दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही मंदिर समितीने कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही केलेली नाही. तसेच सदरचे आश्वासन दिल्यानंतर मंदिर समितीची दि.१२/०५/२०२२ रोजी सभा झाली. त्यामध्ये देखील मंदिर समितीने निर्णय घेतलेला नाही. यावरून मंदिर समिती कर्मचा-यांना शासनाच्या स्थायी कर्मचा-यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू
करण्यास विलंब करित असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचा-यांची आज दुपारी ३ वाजता श्री संत नरहरी सोनार मठ, पंढरपूर येथे बैठक घेतली. त्यामध्ये श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांनी आस्थापनेवरील सर्व कर्मचा-यांना शासनाच्या स्थायी कर्मचा-यांप्रमाणे तात्काळ वेतन व भत्ते लागू करावे अन्यथा जूलै २०२२ पासून आंदोलन करण्याचे बैठकीत ठरले आहे.
सदर बैठकीस श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील १०० कर्मचारी उपस्थित होते.
७ ते ३० वर्षे इतकी सेवा झालेले विविध संवर्गातील कर्मचारी मंदिर समितीच्या आस्थापनेवर तटपुंज्या वेतनामध्ये काम करीत आहेत. सध्या वाढती महागाई लक्षात घेता, मंदिर समितीने सकारात्मक निर्णय घेऊन मंदिर कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांनाप्रमाणे वेतन व भत्ते लागू करावेत अशी अपेक्षा कर्मचारी वर्ग व्यक्त करीत आहेत. वाढती महागाई व तटपुंज्या वेतनामुळे कर्मचा-यांना घरखर्च भागविणे जिकीरीचे होत आहे. त्यामुळे मंदिर समितीच्या कर्मचा-यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.