राजकिय

गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्वप्न पैशाअभावी थांबू देणार नाही;व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार – कौस्तुभ गावडे

शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्तीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील;विद्यार्थ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळवून देण्याचा निर्धार

संपादक – दिनेश खंडेलवाल 

गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्वप्न पैशाअभावी थांबू देणार नाही;व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार – कौस्तुभ गावडे

शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्तीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील;विद्यार्थ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळवून देण्याचा निर्धार

कोल्हापूर:- इंजिनिअरिंग, डिप्लोमा, वैद्यकीय, कृषी यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या गरीब, शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम वेळेत मिळावी, यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचा निर्धार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी व्यक्त केला.

आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही अनेक विद्यार्थी जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर व्यावसायिक शिक्षण घेत आहेत. मात्र, शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्तीचे अर्ज दीर्घकाळ प्रलंबित राहणे, मंजुरीस विलंब होणे आणि मंजूर रक्कम वेळेत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा न होणे, यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी उसनवारी किंवा कर्जाचा आधार घ्यावा लागतो. परिणामी, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते. तसेच, शुल्काची रक्कम वेळेत उपलब्ध न झाल्याने महाविद्यालयांवरही आर्थिक ताण पडतो, त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन तसेच महाविद्यालयातील दैनंदिन आणि अनुषंगिक खर्च भागविण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही.
ही परिस्थिती बदलण्यासाठी शिष्यवृत्ती अर्जांची प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक करणे, अर्ज मंजुरीसाठी निश्चित कालमर्यादा ठरविणे आणि मंजूर शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात वेळेत जमा होण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे. या मागण्यांसाठी संबंधित शासकीय विभागांशी सातत्याने संपर्क साधून प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी स्पष्ट केले.

“शिष्यवृत्ती हा विद्यार्थ्यांचा केवळ आर्थिक आधार नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये. गरीब, शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळणे, ही शिक्षणव्यवस्थेची महत्त्वाची जबाबदारी आहे,” अशी भूमिका कौस्तुभ गावडे यांनी मांडली. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्तीचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लागावा, विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाईल.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक अडथळ्यांपासून मुक्त करणे आणि त्यांच्या गुणवत्तेला संधी मिळवून देणे, हेच आपले ध्येय असल्याचे कौस्तुभ गावडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close