शिक्षकांमधूनच उठाव; शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढणार आणि जिंकणार – डॉ. बी.पी. रोंगे
डॉ. बी.पी रोंगे यांचा पुणे शिक्षक मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

संपादक – दिनेश खंडेलवाल
शिक्षकांमधूनच उठाव; शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढणार आणि जिंकणार – डॉ. बी.पी. रोंगे
डॉ. बी.पी रोंगे यांचा पुणे शिक्षक मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

पंढरपूरच्या नामदेव पायरीवरून डॉ. बी.पी. रोंगे यांनी फोडला प्रचाराचा नारळ

पंढरपूर:- पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्ञानयात्री डॉ. बी.पी. रोंगे यांनी सोमवारी (दि. ५ आक्टोबर) पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील नामदेव पायरीचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. पंढरपुरसह पुणे मार्गावरील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले तसेच त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुण्याकडे प्रस्थान करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमन व स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे, श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे सचिव डॉ. सूरज रोंगे, संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी व रोंगे कुटुंबीय उपस्थित होते. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना डॉ. बी.पी. रोंगे म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांमध्ये शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधत असून त्यांच्या समस्या समजून घेत आहे. शिक्षकांच्या नोंदणी प्रक्रियेतही आम्ही सक्रिय सहभाग घेतला. या कामाला पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शिक्षकांमधूनच उमेदवारीसाठी आग्रह झाल्याने आपण निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

माझ्या उमेदवारीमागे शिक्षकांमधून झालेला उठाव आहे. ४० वर्षांचा संघर्षमय अनुभव, शिक्षक व प्राध्यापक म्हणून कामाचा अनुभव आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने उभे राहण्याची भूमिका यामुळे शिक्षकांनी नेतृत्व करण्यासाठी पुढे येण्याचा आग्रह केला. त्यामुळे त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला,असे डॉ. रोंगे यांनी स्पष्ट केले.
भाजपकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, उमेदवारी जाहीर न झाल्यानंतरही शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाकडून आपल्या कामाची दखल घेतली जाईल, अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले. चंदगडपासून करमाळ्यापर्यंत तसेच मैंदर्गी-दुधनीपासून मुळशीपर्यंत शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.





