दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी ‘इट राईट’ उपक्रमात उत्पादक, विक्रेत्यांचा सहभाग महत्त्वाचा-सहाय्यक आयुक्त प्रदीपकुमार राऊत
अ भा ग्राहक पंचायत ची कार्यशाळा संपन्न

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : दर्जेदार अन्न व अन्न पदार्थ मिळण्याचा सर्वांचा अधिकार आहे. त्यासाठी ‘इट राईट’ या उपक्रमात उत्पादक व विक्रेत्यांनी सहभागी होण्याची गरज आहे असे मत जिल्हयाचे अन्न सुरक्षा विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदिपकुमार राऊत यांनी व्यक्त केले.ते अखिल भारतीय ग्राहक पंचायत व अन्न ,औषध प्रशासन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अन्न व अन्न प्रक्रिया उद्योगातील व्यावसायिकांचे प्रबोधन करण्यासाठी आयोजित कार्यशाळेमध्ये पंढरपूर येथे बोलत होते.
सर्वांना अन्नसुरक्षा कायदा व मानके अनुसार ग्राहकांना दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्याविषयी विचार त्यांनी व्यक्त केले.या कार्यशाळेसाठी पंढरपुरातील अन्न व अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित सर्व व्यावसायिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रारंभी सर्वांचे स्वागत ग्राहक पंचायतीचे तालुका संघटक महेश भोसले यांनी केले. त्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यशाळेची सुरुवात झाली. प्रास्ताविक करताना जिल्हा संघटक दीपक इरकल यांनी या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला.अ. भा. ग्राहक पंचायत ग्राहकांच्या हितासाठी कार्य करते, त्याचबरोबर व्यावसायिकांचे प्रबोधन करून गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने हे प्रयत्न करते. दर्जेदार अन्न मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. त्यादृष्टीने इट राईट हा उपक्रम सर्व देशभरामध्ये केंद्र शासनाच्या वतीने सुरू आहे. त्या अंतर्गत सर्व व्यावसायिकांचे प्रबोधन होऊन, अंमलबजावणी व्हावी अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतीने केली होती. त्याला विभागाने सकारात्मक प्रतिसाद देवुन पंढरपुरामध्ये सदर उपक्रमाची सुरुवात करायचे ठरवले त्याबद्दल त्यांनी सहाय्यक आयुक्त प्रदीप कुमार राऊत यांचे अभिनंदन केले. या यावेळी ‘इट राईट’ उपक्रमात सोलापूर जिल्ह्याने देशांमध्ये एकविसावा क्रमांक पटकावल्याबद्दल अन्न प्रशासन विभाग सोलापूर च्या सर्व अधिकाऱ्यांचा अ.भा. ग्राहक पंचायत व व्यावसायिकांच्या प्रतिनिधींकडून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रांत सहकोषाध्यक्ष विनोद भरते यांनी सर्वांनी व्यवसाय नोंदणी करताना मान्य केलेल्या नियम व अटींचे पालन करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. अशा कार्यशाळेमधून प्रशासन व व्यवसायिक यांच्यामधील दुवा होण्यासाठी ग्राहक पंचायत नेहमी तत्पर असेल,असेही आश्वासन दिले.
सहाय्यक आयुक्त प्रदीपकुमार राऊत यांनी अन्नसुरक्षा कायदा व मानके विषयी सर्वांना सविस्तर मार्गदर्शन केले व ‘इट राईट’ उपक्रमात सहभागी झाल्यामुळे व्यवसायिक गुणवत्तेची वाढ होण्यास मदत होईल व पंढरपुरचा नावलौकिक देशभरामध्ये होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.अन्नपदार्थ तयार करत असताना तेल आणि पाणी चांगले असणे आवश्यक आहे.परिसराची स्वच्छता राखणे ही आवश्यक आहे. अशा प्रकारे इट राईट उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती व व्यावसायिकांच्या शंकांचे समाधानही प्रशासनाकडून करण्यात आले.
अन्न निरिक्षक नंदिनी हिरेमठ यांनीही सर्वांना मार्गदर्शन केले.यावेळी सोलापूर विभागातील अन्न निरीक्षक उमेश भुसे, प्रज्ञा सुरसे ,रेणुका पाटील उपस्थित होते.
पंढरपुरचे अन्न निरीक्षक प्रशांत कुचेकर यांनी आषाढी वारी दरम्यान व्यावसायिकांनी घ्यावयाच्या काळजी संदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात श्रीविठ्ठल कृपा स्वीट्स,बेकर्स अँड हॉटेल असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष पांडुरंग बापट यांनी मनोगत व्यक्त केले तर डेअरी व्यवसायिकांच्या वतीने शशिकांत कराळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप करताना ग्राहक पंचायत प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख यांनी व्यावसायिक आणि प्रशासन व ग्राहक यांच्यातील योग्य समन्वयाने ग्राहकांचे हित जपण्याचा ग्राहक पंचायत सातत्याने प्रयत्न करत आहे,त्याला प्रशासन व व्यवसायिक यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांनी सर्वांचे आभार मानले तर तालुका सचिव प्रा. धनंजय पंधे यांनी सुत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सचिव सुहास निकते,जिल्हा कार्यकारणी सदस्य अण्णा ऐतवाडकर ,पांडुरंग अल्लापुरकर ,तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये, सहसचिव दिलीप पाठक, जिल्हा प्रबोधन समिती प्रमुख डॉ. प्रशांत ठाकरे, कार्यकारणी सदस्य आझाद अल्लापुरकर,गणेश मेटकरी शहाजी जाधव,रघुनाथ राजमाने, रामदास डोंगरे,गणेश हेगडे, यांनी विशेष परिश्रम घेतले.