ईतर

जटिल हृदयविकारांवर ‘इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी’ उपचारपद्धती ठरतेय वरदान

कॅल्शियमयुक्त ब्लॉकेजवरील अत्याधुनिक उपचारामुळे अँजिओप्लास्टी अधिक सुरक्षित

संपादक – दिनेश खंडेलवाल

जटिल हृदयविकारांवर ‘इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी’ उपचारपद्धती ठरतेय वरदान

कॅल्शियमयुक्त ब्लॉकेजवरील अत्याधुनिक उपचारामुळे अँजिओप्लास्टी अधिक सुरक्षित

सांगोल्याचे सुपुत्र हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप देवकते यांची माहिती

पंढरपूर ::- हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियमचे कठीण थर साचल्यामुळे अनेक रुग्णांमध्ये अँजिओप्लास्टी करताना स्टेंट योग्य प्रकारे बसविणे मोठे आव्हान ठरते. अशा जटिल हृदयविकारग्रस्त रुग्णांसाठी ‘इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी’ (IVL) ही अत्याधुनिक उपचारपद्धती प्रभावी ठरत असून, उपचार अधिक सुरक्षित, परिणामकारक आणि दीर्घकालीन यशस्वी होत असल्याची माहिती सांगोल्याचे सुपुत्र व सांगलीतील सिनर्जी हॉस्पिटलमध्ये कार्यरत प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप देवकते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, वाढते वय, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि अनियमित आहार यांसारख्या कारणांमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियमचे कठीण थर तयार होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी रक्तवाहिनीची लवचिकता कमी होत असल्याने स्टेंट योग्य प्रकारे बसविणे कठीण जाते. परिणामी उपचार अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता असते.

यावर आधुनिक वैद्यकीय क्षेत्राने विकसित केलेली इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी (IVL) ही उपचारपद्धती अत्यंत प्रभावी ठरत आहे. या तंत्रज्ञानामध्ये विशेष धक्कातरंगांच्या (Shockwaves) सहाय्याने रक्तवाहिन्यांतील कॅल्शियमच्या थरांमध्ये सूक्ष्म भेगा निर्माण केल्या जातात. त्यामुळे रक्तवाहिनी अधिक लवचिक बनते आणि स्टेंट अचूक व सुरक्षितपणे बसविणे शक्य होते.

डॉ. प्रदीप देवकते यांनी सांगितले की, पारंपरिक उपचारांच्या तुलनेत आयव्हीएलमुळे रक्तवाहिनीला होणारी इजा कमी होते. उपचारादरम्यान गुंतागुंत होण्याचा धोका घटतो, तसेच स्टेंट पूर्णपणे विस्तारल्यामुळे दीर्घकालीन परिणाम अधिक चांगले मिळतात. विशेषतः जास्त प्रमाणात कॅल्शियमयुक्त ब्लॉकेज असलेल्या रुग्णांसाठी ही उपचारपद्धती आशेचा किरण ठरत आहे.

ते पुढे म्हणाले की, हृदयविकाराच्या उपचारांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सातत्याने वाढत आहे. पूर्वी महानगरांमध्येच उपलब्ध असलेली अशी सुविधा आता सांगलीतील सिनर्जी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली असून, त्यामुळे सांगोला व परिसरातील रुग्णांना दूरच्या शहरांमध्ये जाण्याची गरज उरलेली नाही. अत्याधुनिक सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने वेळ, खर्च आणि उपचारातील विलंबही टाळता येत आहे.

हृदयविकाराची लक्षणे दुर्लक्षित करू नयेत, नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, मधुमेह व रक्तदाब नियंत्रणात ठेवावा आणि छातीत दुखणे, धाप लागणे किंवा अस्वस्थता जाणवल्यास तातडीने हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही डॉ. देवकते यांनी केले.

रुग्णांसाठी आधुनिक उपचाराचा नवा पर्याय
जटिल कॅल्शियमयुक्त ब्लॉकेज असलेल्या रुग्णांसाठी इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी (IVL) ही उपचारपद्धती आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रगती मानली जात आहे. सुरक्षितता, अचूकता आणि प्रभावी परिणाम यामुळे ही उपचारपद्धती अनेक रुग्णांसाठी वरदान ठरत असून, हृदयविकाराच्या उपचारांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close